औरंगाबाद : बहुमत चाचणीआधी ठाकरे सरकारला आपली सत्ता जातेय हे समजलं. खुर्ची जातेय हे लक्षात आलं. पुन्हा आम्ही केव्हा मुख्यमंत्री होऊ हे माहिती नसल्याने यांना जाता जाता संभाजी महाराज यांची आठवण आली", असा जोरदार हल्लाबोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या संभाजीनगर नामंतराला मान्यता देण्यात आली. या मुद्द्यावरुन जलील यांनी सडकून टीका केली. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही हल्लाबोल केला. (aimim mp imtiaz jaleel attack on shiv sena cm uddhav thackeray sharad pawar and sonia gandhi over to issue of renaming aurangabad)
"25-30 वर्षांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेचा वापर शिवसेनेने राजकीय फायद्यासाठी आणि निवडणुकीपुरताच केला. तसेच आपली खुर्ची धोक्यात आल्याचं समजताच हा निर्णय घेतला", अशी सनसनाटी टीका जलील यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.
"मी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो की, इतिहास बदलता येत नाही, नाव बदलता येतं. तुमच्याकडे दाखवण्यासारखं काही नाहीये. तेव्हा तुम्ही अशा खालच्या दर्जाचं राजकारणाचं नमुना देऊन जाताय", अशीही टीका जलील यांनी केली.
"औरंगाबादचं नाव काय राहिल आणि काय नाही, हे इथली जनताच ठरवेल. तसेच दुसरा मुद्दा असा की या निर्णयाने तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे, असा प्रश्नही यावेळेस उपस्थित केला.
"औरंगाबादमधील पाणी प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. औरंगाबादमध्ये आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळतं, उद्धवजी ही तुमच्यामुळे वेळ ओढावली आहे. तुम्ही आणि तुमच्या पक्षाच्या इथल्या नेत्यांनी गेल्या 25 वर्षांपासून जनतेला ओरबाडून खाण्याचं काम केलं आहे. आज तेच नेते तिथे जल्लोष करतायेत, आनंद साजरा करतायेत. आता ते कोणता मुद्दा घेऊन नाचणार आहात", असा प्रश्नही जलील यांनी बंडखोर आमदारांना विचारला.
"लोकांच्या हितासाठी तुम्ही काही केलं असतं तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. मात्र तुम्ही खालच्या दर्जाचं राजकारण करताय. शहराचं, रस्त्याचं, गल्लीचं नाव बदलण्याचं राजकारण करताय याची आम्ही निंदा करतो", असंही खासदार म्हणाले.
दरम्यान जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा दलाल असा उल्लेख केला. " तसेच मी त्या दलालांचा निषेध करतो जे स्वत:ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणवतात."
"काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जिथे दिसतील तिथे त्यांच्या फोटोला चपलांचा हार घाला" असं आवाहनही जलील यांनी राज्यातील सर्व एमआयएमच्या कार्यकर्त्यांना केलं.
राजकारणासाठी यांनी खालच्या दर्जाचं राजकारण केलंय. औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दलाल नेते निघाले तर यांना पाहून थुंकायला हवं. सत्तेचा इतका मोह होता तर चिटकून राहायचं", असं जलील यांनी नमूद केलं.
"शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातील नेत्यांना तुम्ही काय तोंडात लाडू घेऊन बसला होतात का, आता या मराठवाड्यात बघा तुमचं कसं स्वागत करतो", असा इशाराच जलील यांनी दिला. यासह त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा निषेध केला.