ए़़डस बाधित आणतायत दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीसाठी आता हळूहळू बाजार सजायला सुरुवात होईल. प्रकाशाचा हा सण साजरा करण्यासाठी अनेक हात कामाला लागलेत. 

Updated: Oct 12, 2017, 04:37 PM IST
ए़़डस बाधित आणतायत दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश title=

मुकूल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीसाठी आता हळूहळू बाजार सजायला सुरुवात होईल. प्रकाशाचा हा सण साजरा करण्यासाठी अनेक हात कामाला लागलेत. 

दुसऱ्याच्या आयुष्यात उजेड आणण्याचा प्रयत्न

स्वतः अंधारात राहून दुस-याचा सण प्रकाशमान करण्याची धडपड नाशिकमधल्या महिलांची सुरू आहे.

स्वत:ची ओळख लपविण्यासाठी चेहरा झाकून काम करणा-या या सगळ्याजणी. सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश पर्वाचा उत्साह आणि आनंद निर्माण व्हावा, यासाठी हे हात झटत आहेत.

मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष

एचआयव्ही पिडीत महिला आजही समाजच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहेत.. कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना निरीक्षणाच्या माध्यमातून अत्यंत आकर्षक आकाशकंदील आणि तितक्याच उत्कृष्ट पणत्या त्यांनी साकारल्या आहेत.

रोजगारातून त्यांची दिवाळी साजरी

गेली तीन वर्षं शहरातल्या 20 ते 25 एडसबाधित महिला एकत्र येऊन हा उपक्रम करत आहेत.  त्यातूनच त्यांना रोजगार मिळतोय. आणि त्याच रोजगारातून त्यांची दिवाळी साजरी होते.

तीन वर्षांपासून उत्पन्नात सातत्यानं वाढ 

गेल्या तीन वर्षांपासून या महिलांच्या उत्पन्नात सातत्यानं वाढ होतेय. दिवाळीच्या काळातच नाही तर वर्षभर कापडी पिशव्या बनविणे, फाईल बनविणे असे उपक्रम सुरु असतात. 

मात्र हक्काची बाजारपेठ अजूनही नाही

मात्र हक्काची बाजारपेठ अजूनही त्यांना मिळालेली नाही. एच आय व्ही बाधित महिलांनी वस्तू बनविल्या हे कळल्यावर अनेक ग्राहक वस्तू घेण नाकारतात. म्हणूनच दिवाळीचा फराळ बनविण्याची इच्छा  असूनही आपण बनविलेले खाद्य पदार्थ कोणी विकत घेणार नाहीत, ही भीती त्यांच्या मनात कायमच आहे.

१४ हजार एच आय व्ही पीडीत रुग्ण

नाशिक जिल्ह्यात जवळपास १४ हजार एच आय व्ही पीडीत रुग्ण असल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. त्यात पाच हजार लहान मुलांचा समावेश आहेत. मात्र प्रत्येक जण आज समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करतोय. 

समाजात सन्मानाची वागणूक देण्यासाठी

एड्स संदर्भातील जनजागृतीवर सरकराचा कोट्यवधी रुपयाचा खर्च होतोय, मात्र त्याचा सकरात्मक परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळेच ह्या वर्गाला समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी आणि कायम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सगळ्यांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे.