विष्णु बर्गे, झी मीडिया, बीड : जगभरात मोठी मागणी असताना राज्यात कांदा (Onion) पिकाचा भाव गडगडला आहे. अहमदनगरच्या मार्केटमध्ये कांद्याला (Onion Price) केवळ दोन रुपये भाव मिळला आहे. आष्टी तालुक्यातील बावी नामदेव लटपटे या शेतकऱ्याने आठ क्विंटल 44 किलो कांदा अहमदनगरच्या बाजारात विक्रीला दिला होता. मात्र बाजारभाव पडल्याने सर्व खर्च वजा करुन शेतकऱ्याला केवळ एक रुपया मिळाला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बावी येथील नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी तीन एकर शेतीमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले होते. यातील कांद्याच्या 17 गोण्या लटपटे यांनी अहमदनगर येथे मार्केटमध्ये नेऊन विकल्या. मात्र याचा त्यांना केवळ एक रुपया मिळाला. तीन एकर कांदा उत्पादन करण्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च केल्यानंतर लटपटे यांना एक रुपया मिळाला आहे.
"कांद्याच्या एका गोणीसाठी 100 रुपये खर्च येतो आणि 17 गोण्यांसाठी मला 1 रुपया मिळाला. दोन दिवस तिथे होतो. मला वाटलं पाच ते सहा हजार रुपये मिळतील. पण तिथे जेवायलाही मिळालं नाही," अशी खंत नामदेव लातपटे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
एक रुपयात आम्ही कसं जीवन जगायचं?
"तीन एकर शेतीमध्ये कांदा लावला होता. त्यासाठी 18 हजार रुपयांचे 10 किलो बी आणले होते. त्यानंतर 12 हजार प्रतिएकर असा लावणीसाठी खर्च केला. प्रत्येक एकरामध्ये पाच पिशव्या खत टाकले. कांदा खुरपण्यासाठी प्रत्येक एकराला 10 हजार रुपये दिले. सर्व मिळून एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. आम्हाला दोन ते तीन लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. कांदा विकायला नेला तर फक्त 1 रुपया हातात आला. आता या एक रुपयात आम्ही कसं जीवन जगायचं? पैशासाठी मजूर आमच्या घरी येऊन बसले आहेत. आता आम्ही त्यांना कसे पैसे द्यायचे? एक रुपया आम्ही आता देवाकडे ठेवणार आहोत तोच काय करायचे ते करेल. आमचं जगणं मुश्किल झालं आहे. मुख्यमंत्र्यांनाच एक रुपया पाठवयाचा होता पण त्यासाठी दहा रुपये लागत असल्याने आम्ही तो निर्णय मागे घेतला," असे मनिषा लाटपटे यांनी म्हटले.