नाशिक- नाशिक येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला पकडताना स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात जमाव केला. त्यामुळे वनविभागाला मदत करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे. बिबटा दिसल्याची माहिती मिळताच वन विभाग- पोलिस कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी उपस्थित झाले. सलग आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठला बिबट्याला पाहताच लोकांचा जमाव झाला. त्यामुळे गर्दी नियंत्रित करताना वनविभागाच्या नाकी नऊ आले. बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाला गर्दीमुळे अडचणीचा सामना करावा लागला. बिबट्याला पकडताना, बिबट्याकडून नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये, याची वनविभाग खबरदारी घेत असतो. स्वंयसेवी कार्यकर्यांनी सांगितले की, बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. गर्दीच्या जमावामुळे कोणताही प्राणी घाबरतो. तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी तो कोणत्याही क्षणी हल्ला करु शकतो. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना याची पूर्णपणे कल्पना देण्यात आलेली असते.
अशा वेळी स्थानिकावर बिबट्याने हल्ला केला असता, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. यामुळे नागरिकांनी वनविभागला मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणीत भर टाकण्याचे काम केले आहे. सुदैवाने कोणत्याही नागरिकांना इजा झाली नाही. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार जखमी झाले, असे वनविभाने सांगितले.