Loksabha Election 2019 : माझ्या उमेदवारीने अनेकांना धडकी- अमोल कोल्हे

अमोल कोल्हे गरजले.... 

Updated: Mar 17, 2019, 01:50 PM IST
Loksabha Election 2019 : माझ्या उमेदवारीने अनेकांना धडकी- अमोल कोल्हे title=

पुणे : अभिनय विश्वातून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेता आणि राष्ट्रवादी पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी नुकतच एका जाहीर सभेत आपली ठाम भूमिका मांडली. पुण्यातील चाकण येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आपल्याला उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना धडकी भरल्याची गर्जना करत कोल्हे यांनी अनोख्या शैलीत सभेसाठी उपस्थित जनतेला संबोधित केलं. राजकीय पटलावर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या कोल्हे यांना शिरुर मतदार संघातून तिकीट देण्यात आलं. पण, स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष मात्र त्यांच्यावर ओढावला होता. 

मतदार संघातून होणारा विरोध आणि आपल्या नावाविरोधात लावण्यात आलेल्या फलकांचं राजकारण पाहता कोल्हे यांनी आपल्या भाषणातून रविवारी विरोध करणाऱ्यांना धारेवर धरलं. 'राजकारणाच्या या पटलावर मी स्वत:ला उमेदवार समजत नाही. तर, मी एक जनतेचा प्रतिनिधी आहे, जनतेच्या घरातीलच मी एक सदस्य आहे', असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अनोल कोल्हे यांच्या भाषणाच्या शैलीने उपस्थितांची दाद मिळवली खरी. पण, आता ते मतदारांची मनं जिंकण्यात यशस्वी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

खासदार निवडून देण्यासाठीची ही संसदीय समितीनी निवडणूक असल्याचं म्हणत ही निवडणूक ही खासदार निवडण्यासाठीही आहे ही बाब मतदारांनी लक्षात घ्यावी, असं कोल्हे यांनी प्रकर्षाने सांगितलं. पंतप्रधान कोण होणार हे दिल्लीतील राष्ट्रीय नेते ठरवणार असल्याचं म्हणत त्यांनी तरुण मतदारांचं लक्ष वेधलं. 'वैयक्तिक टीका करत असाल तर मी तशी टीका करणार नाही कारण, तसे संस्कार माझ्यावर नाहीत. मी छत्रपतींचा मावळा आहे कोणाला भीत नाही. हवी तितकी टीका करा. पण, तुमच्या टीका करण्याने या भागातील प्रश्न सुटणार आहेत का? माझ्यावर टीका करुन या भागात झालेल्या फसवणुकीचं उत्तर सर्वसामान्य मतदारांना मिळणार आहे का?', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विलास लांडे समर्थकांनी केला होता कोल्हेंना विरोध 

शिरूर राष्ट्रवादीकडून अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आणि राजकीय गणित बदलली. पण, त्यांच्याविरोधात शिरूर मतदारसंघात मात्र कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना अमोल कोल्हे यांची उमेदवारी रूचली नसल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. विलास लांडे समर्थकांनी अमोल कोल्हे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. एकिकडे पक्ष अडचणीत असतानाही ज्यांनी निष्ठा कायम राखत पक्षाला साथ दिली त्या विलास लांडे यांना दूर ठेवल्याचा राग कार्यकर्ते जागोजागी फलक झळकावून व्यक्त करत करण्यात आला होता. अमोल कोल्हेंना त्यांची योग्य जागा दाखवणार असा इशाराच त्यांना देण्यात आला होता.