लॉकडाऊन: कल्याण डोंबिवलीत पहिल्याच दिवशी 550 वाहनांवर कारवाई

कल्याण-़डोंबिवलीत आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

शैलेश मुसळे | Updated: Jul 2, 2020, 08:42 PM IST
लॉकडाऊन: कल्याण डोंबिवलीत पहिल्याच दिवशी 550 वाहनांवर कारवाई title=

आतिष भोईर, कल्याण : कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सकाळपासून पुन्हा लॉकडाऊन लागू झाले आहे. आजपासून 12 जुलैपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरता 1 दिवसांचा लॉगडाऊन घेण्यात आला आहे.  या दरम्यान विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आणि त्यांच्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पहिल्या दिवशी तब्बल 550 वाहनांवर कारवाई केली. तर काही गाड्यांची हवा काढण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या या गाड्या संध्याकाळी पुन्हा परत दिल्या जाणार आहेत. तर काही वाहन चालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. 'पुढील 10 दिवस आपण विनाकारण घराबाहेर पडू नका. आमच्याकडून यापुढे ही अशीच कारवाई सुरू राहाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी कल्याण डोंबिवली शहरांची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आणि इतर पोलीस अधिकारीही उपस्थित होते. नागरिकांनी आज ज्याप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद 12 तारखेपर्यंत द्यावा आणि सहकार्य करावे. तसेच अनावश्यक घराबाहेर पडू नये, सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. 

कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज सर्वाधिक 560 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 3090 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.