'आम्ही टॉपर घडवतो..' खासगी क्लासच्या खोट्या जाहिरातीतून तुमचीही झालीय फसवणूक? 'येथे' नोंदवा तक्रार

Private Classes Falsely Advertise:  आपली फसवणूक झाल्याचे कळायला विद्यार्थी आणि पालकांना उशीर झालेला असतो. पण आता हे फसवणूक करणारे क्लासेस कायद्याखाली आले आहेत. यामुळे पालकांची आर्थिक शोषणापासून सुटका होणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2024, 08:51 AM IST
'आम्ही टॉपर घडवतो..' खासगी क्लासच्या खोट्या जाहिरातीतून तुमचीही झालीय फसवणूक? 'येथे' नोंदवा तक्रार title=
Private classes falsely advertise (प्रातिनिधिक फोटो)

Private Classes Falsely Advertise: आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण, अशा जाहिरातींचे फलक तुम्ही पाहिले असतील. अशा जाहिरातींना भुलून विद्यार्थी खासगी शिकवणीला प्रवेश घेतात. यानंतर प्रत्यक्षात तशा प्रकारचे शिक्षणच दिले जात नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. पण तोपर्यंत क्लासेलवाल्यांनी वर्षाची फीस घेतलेली असते. आपली फसवणूक झाल्याचे कळायला विद्यार्थी आणि पालकांना उशीर झालेला असतो. पण आता हे फसवणूक करणारे क्लासेस कायद्याखाली आले आहेत. यामुळे पालकांची आर्थिक शोषणापासून सुटका होणार आहे. 

खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर कारवाई केली जाणार आहे.  यासंदर्भात ग्राहक संरक्षण नियामकांनी सूचना मागवल्या आहेत. आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण असे भ्रामक दावे करत अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. मात्र, आता अशा खोट्या जाहिराती केल्यास क्लासचालकांवर ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

देशभरात फसवणूक करुन लाखोंची लूट करणाऱ्या क्लासेसचे पेव आले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण हवे असते. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, अनेक ठिकाणी शिक्षक स्किलफूल नसल्याने, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी क्लासेसचा मार्ग पकडतात. अनेक प्रकरणांमध्ये तर केवळ स्टेटस दाखवण्यासाठी, दुसरा जातो म्हणून, त्यानिमित्ताने अभ्यास करेल म्हणून विद्यार्थ्यांना पालक चांगल्या क्लासेसला पाठवतात. 

चांगल्या क्लासेसची व्याख्या अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. याचाच फायदा क्लासेसवाले घेतात. ते माफक दरात दर्जेदार शिक्षण देण्यापेक्षा जाहिरातींवर लाखोचा खर्च करतात, मोठमोठ्या बतावण्या करतात. मुलांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे पालक  यांच्या भूलथापांना बळी पडून लाखो रुपये गुंतवतात. अशा हजारो तक्रारी ग्राहक संरक्षण केंद्राकडे येत असतात. त्यामुळे लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.  

ग्राहक संरक्षण नियामकांनी (सीसीपीए) खासगी शिकवणी संदर्भातील मसुद्यावर हरकती मागवल्या आहेत. या हरकतींचा गांभीर्याने विचार करुन त्याविरोधात कडक पावले ऊचलली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

क्लासेसच्या क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर नागरिक 16 मार्चपर्यंत सूचना आणि हरकती पाठवू शकतात. त्यामुळे तुमची किंवा तुमच्या ओळखीत कोणाची खासगी क्लासेसवाल्यांकडून फसवणूक झाली असेल, तर ग्राहक संरक्षणच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही यासंदर्भातील तक्रार नोंदवू शकता. 

मार्गदर्शक तत्त्वे खासगी शिकवणी क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहेत. शिकवणी क्षेत्रातील कोणालाही हे नियम लागू होतील. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे नियमन ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार केले जाणार आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे नियमांमध्ये स्पष्टता आणतील आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करतील, असेही सांगण्यात आले आहे. 

कोचिंग संस्थांवर ही बंधने..

- कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेतील यशाचा दर, निवड संख्या किंवा विद्यार्थ्यांच्या मानांकनाबाबत सत्यापित पुराव्याशिवाय खोटे दावे करणे टाळावे.

- विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची कबुली न देता, विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ कोचिंग जबाबदार आहे, असे भासवू नये.

- विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी खोटी भावना निर्माण करू नये की, कोचिंग अत्यावश्यक आहे.

- कोचिंग संस्थांनी अशा कोणत्याही गोष्टीत गुंतू नये, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होईल किंवा ग्राहकांची स्वायत्तता नष्ट होईल.

- कोचिंग सेंटर्सने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कोचिंगचा सहभाग किती प्रमाणात आहे?, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.