"मुलीचे तुकडे केले तसे त्याचेही तुकडे करणार"; दर्शना पवारच्या आईचा संताप

Darshana Pawar Murder Case : 18 जून रोजी राजगडावर दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. दर्शनासोबत तिचा मित्र राहुल हांडोरेही राजगडावर गेला असल्याचे तपासात समोर आले आहे. राजगडावर गेल्यानंतर काही वेळाने तो एकटाच गड उतरल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं होतं. पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 22, 2023, 01:39 PM IST
"मुलीचे तुकडे केले तसे त्याचेही तुकडे करणार"; दर्शना पवारच्या आईचा संताप title=

Darshana Pawar Murder Case : एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येने राज्यात एकच खळबळ उडाली होती. राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर पोलीस तपासात दर्शना राहुल हांडोरेसोबत राजगडला गेल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात दर्शनाची हत्या झाल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी (Pune Police) राहुल हांडोरेचा शोध सुरु केला होता. गुरुवारी अखेर राहुल हांडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या अटकेनंतर राहुलला फाशी देण्याची मागणी दर्शनाच्या कुटुंबियांनी केली आहे.

मूळची नगर जिल्ह्यातील कोपरगावची रहिवासी असलेल्या दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली होती. तिचा सत्कार करण्यासाठी पुण्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी ती पुण्यात आली होती. त्यावेळी तिने आपण राजगड फिरायला जात असल्याचे मैत्रिणीला आणि कुटुंबियांना सांगितले होते. मात्र त्यानंतर तिचा फोन बंद झाला. तपासात ती राहुल हांडोरेसोबत राजगडावर फिरायला गेल्याचे समोर आले होते. राहुल बाईकवरुन दर्शनाला राजगडला घेऊन गेला होता. मात्र त्यानंतर तो तिथून एकटाच परतला होता. इकडे दर्शनाच्या कुटुंबियांनी मुलीचा शोध लागत नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासात दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते.

दर्शनाला फसवून घात केला

"जशी माझ्या मुलीची हत्या केली तशीच त्याची हत्या करायची आहे. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि मीच देणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झाला पाहिजे. तो राहिलाच नाही पाहिजे. माझी मुलगी गेलेलीच आहे अजून पन्नास मुली गेल्या नाही पाहिजेत. त्यांच्यात काहीच नव्हते. ते दोघे फक्त अभ्यासावरच बोलायचे. त्याने फसवून दर्शनाला नेले आणि तिचा घात केला. त्याला माझ्या ताब्यात द्या मी पण त्याचा तसाच घात करेन," असे दर्शनाच्या आईने म्हटलं आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी

"माझ्या बहिणीसोबत अन्याय झाला असून कोर्टाने लवकरात लवकर निर्णय देऊन आरोपीला फाशी झाली पाहिजे. यामध्ये त्याच्या घरच्यांचा देखील सहभाग असल्याने त्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. आमचे कोणतेही नातेसंबंध आरोपीसोबत नव्हते. आमची मागणी एवढीच आहे की आरोपीला लवकरात फाशीची शिक्षा झाली पाहिजे," असे मृत दर्शना पवारच्या भावाने म्हटलं आहे.