जालना : लॉकडाऊन अजूनही कायम असला तरी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संकटांवर मात करत खरीप पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात शेतीच्या मशागतीनंतर पेरणीपूर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या आठवड्यात पेरणीसाठी आवश्यक असलेली सर्वच कामं जवळपास पूर्णत्वाकडे जाणार आहे.
अखेर लॉक डाऊन काळातही आलेल्या सर्व संकटांवर मात करत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला चांगलाच वेग दिलाय.लॉक डाऊन लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात पेट्रोलपंप बंद होते.त्यामुळे ट्रॅक्टरला देखील डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टरच्या माध्यमातून होणारी शेतीमशागतीची कामं थांबली होती.अखेर आता ट्रॅक्टरची चाकं शेती मशागतीच्या कामासाठी वेगानं धावू लागलीय.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नांगरणीची कामं संपलीय. रोटाव्हेटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जमीन पेरणीसाठी सज्ज केलीय.जिल्ह्यात मिरची ,कपाशी,सोयाबीन ही नगदी पिकं घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो यंदाही हीच पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कायम आहे.
अनेक भागात मिरची,आद्रक ही पिकं लागवडीसाठी जमीन तयार करून काही शेतकऱ्यांनी ठिंबकच्या नळ्या देखील जमिनीवरील बेडवर अंथरूण ठेवल्यात. त्यामुळे मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांना फक्त पावसाची प्रतिक्षा आहे.तर अनेक भागात लॉकडाऊनमुळे वेळेवर ट्रॅक्टर न मिळाल्याने अजूनही नांगरणी रखडली आहे.
नांगरणीसाठी गव्हाच्या जमिनीवरील जाळपोळ शेतकऱ्यांनी सुरु केलीय,पावसाळ्याच्या सुरुवातीला खतांचे भाव गगनाला भिडतात त्याचा फटका बसू नये म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खत भरणी पेरणीआधीच करून ठेवलीय. जिल्ह्यात कपाशी,मका,सोयाबीन ही मुख्य नगदी पिकं हेत.त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागानं खतं,औषधी,पुरवठयासाठी नियोजन सुरु केलंय.यावर्षी चांगला आणि लवकर पाऊस पडावा हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.