Maharashtra Politics : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (maharashtra winter session 2022) सध्या नागपूरात सुरु आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध मुद्यांवरुन सरकारवर टीका केली जात आहे. मात्र महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांमध्येच अंतर्गत वाद असल्याचे पाहायला मिळत आहेत.
सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हेच या बैठकीला गैरहजर होते. तसेच कॉंग्रेस नेतेही या बैठकीला अनुपस्थित होते.
गैरहजेरीचं कारण काय?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बैठकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या नेत्यांची पाठ फिरवली आहे. सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत नसल्यामुळे तसेच सभेत सभागृहात बोलायला मिळतं नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात ही बैठक पार पडली होती.
दुसऱ्यांदा वादाची ठिणगी
दरम्यान, याआधीही मंगळवारी अधिवेशनात नागपुरातील एनआयटीच्या भूखंड मंजुरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागावा यासाठी ठाकरे गट आक्रमक होता. विधानसभेत हा मुद्दा सुरुवातीलाच मांडला जावा यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते. मात्र विरोधी पक्षनेते यांनी कामकाज सुरु झाल्यानंतर निधीवाटपावरुन चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विसंवाद दिसून आला.
अंबादास दानवे यांचे स्पष्टीकरण
"मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी ही आता राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही पुढे केली आहे. यामुळे विरोधकांच्या आक्रमकतेमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बैठकीला आमचा प्रतिनिधी उपस्थित होता," असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले आहे.