'त्या' एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं 'ठाणे' कनेक्शन

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. यामध्ये ट्रक चालकांना घाबरत एक अफवा पसरली जात होती. यानंतर चालक दहशतीत होते. तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं.   

शिवराज यादव | Updated: Jan 19, 2024, 12:05 PM IST
'त्या' एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं 'ठाणे' कनेक्शन title=

महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका व्यक्तीवर अफवा पसरवत लोकांमध्ये दहशत पसरवल्याचा आरोप आहे, पोलिसांनी दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. या व्हिडीओतून ट्रक चालकांना घाबरवत एक खोटी अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे ट्रक चालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 

पोलिसांनी तपास केला असता, गुजरातमधील पंकज गिरी याने ही अफवा पसरवल्याचं उघड झालं. तो बडोद्यात वास्तव्यास आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या कार्यालयातून बेड्या ठोकल्या आहेत. 

चालकांना ठार करण्याची शपथ

झालं असं की, पंकज गिरीने 10 जानेवारीला एक व्हिडीओ मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, नवी मुंबईच्या न्हावाशेवा येथे एक मोठं बंदर आहे. येथे एका सरपंचाच्या मुलाचा अपघात झाला आहे. तसंच सरपंचाने याचा बदला घेण्यासाठी 11 चालकांना ठार करण्याची शपथ घेतली आहे असंही सांगण्यात आलं होतं. 

पंकज गिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ट्रकचालकांसह जड वाहनांची वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी आपल्या नियमित कामांसाठी न्हावाशेवा परिसरात जाण्यास नकार दिला होता. 

न्हावाशेवा बंदारात रोज शेकडो कंटनेर्सची वाहतूक होत असते. तसंच तितक्याच प्रमाणात ट्रकही ये-जा करत असतात. त्यामुळे ही अफवा पसरल्यानंतर चालकांमध्ये भीती निर्माण झाली आणि याचा तेथील कामकाजावर मोठा परिणाम होऊ लागला होता.  

यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी कसून तपास केला असता पंकज गिरी याने हा सगळा बनाव रचला असल्याचं उघड झालं. पंकजने व्हिडीओत सरपंचाच्या मुलाचा अपघात झाल्याचं सांगितलं होतं. पण तसा कोणताही अपघात झाला नव्हता. यानंतर पोलिसांनी पंकज गिरीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसंच आरोपीला अटक करण्यात आली आहे.