विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : आरसा हा माणसाचा त्याचं खर रुप दाखवतो. याच आरशाने एका चिमुरडीला मृत्यूचा चेहरा दाखवला आहे. आरशात पाहताना एका पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे. काही करण्याच्या आताच कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर या मुलीचा मृत्यू झाला. बीडमध्ये ही मन सून्न करणारी घटना घडली आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहेय संपूर्ण घटनाक्रम पाहिला असता अंगावर काटा येईल. मेकअप आरसा अंगावर पडल्याने गळ्यात काच घुसून पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलगी गेवराई तालुक्यातील खेरडावाडी गावात राहणारी आहे.
आरोही गोपाल भिसे असं या चिमुकलीचे नावं आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.पाच वर्षाची आरोही घरात खेळत होती. बाकीचे घरातली लोक इतर कामात व्यस्त होती. मात्र, खेळता खेळता सोप्यावर चढून बांगड्या ठेवताना हातातल्या बांगड्या मेकअप आरश्याच्या हुकात गुंतल्या आणि सोप्या वरचा पाय निसटला. यामुळे आरसा अंगावर पडला आणि आरशाच्या काचाचे तुकडे सर्वत्र झाले.
मात्र, आरशाच्या काचेचा एक तुकडा पाच वर्षाच्या आरोहीच्या गळ्यात घुसला. आरोहीची किंचाळी ऐकून घरातील सर्व जण खोलीकडे धावले. समोर जे दृष्य दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खोलीमध्ये सर्वत्र काचांचा खच पडला होता. यातील काचेचा एक तुकडा आरोहीच्या गळ्यात घुसला होता. कुटुंबियांनी काचेचा तुकडा काढण्याचा प्रयत्न केला. दवाखान्यात पोहोचेपर्यंत आरोहीचा दुर्दैवी अंत झाला होता.
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे 12 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. संजीव बाशीराम झमरे असे मृत्यू झालेल्या 12 वर्षीय मुलाचे नाव असून तो रात्री लघुशंके साठी घराच्या बाहेर आला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावर हल्ला केला आहे. मध्य प्रदेश मधील हे कुटुंब शेतात मजूर काम करण्यासाठी ओतूर येथे आले होते यावेळी ही घटना घडली असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदन साठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला आला आहे.
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या मोंटो कार्लो या कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पडून एका 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीप सुनील शेलार अस या 17 वर्षीय युवकाच नाव असून तो पालघर मधील बोरशेती येथील रहिवासी होता. पाय घसरून दिप या खड्ड्यात पडला असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दीपच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल झाला असून मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत. या सगळ्या घटनेमुळे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या कंपन्यांचा मनमानी कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.