नागपुरात एका बसचालकाने अनोखं धाडसं दाखवलं असून सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे. दरोडेखोरांकडून गोळीबार होत असतानाही चालकाने बस थांबवली नाही. हाताला गोळी लागलेली असताना रक्तबंबाळ अवस्थेत बस चालवत त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. तब्बल 30 किमीपर्यंत त्याने बस चालवली आणि बसमधील 35 प्रवाशांना वाचवलं. अमरावती-नागपूर हायवेवर हा थरार घडला आहे.
मिनीबसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व भाविक बुलढाण्याच्या शेगावमधून नागपूरला निघाले होते. खोमदेव खोपडे ही बस चालवत होते. यादरम्यान काही दरोडेखोर कारमधून बस लुटण्याच्या उद्देशाने पोहोचले होते. त्यांनी बसचा पाठलाग सुरु केला असता खोमदेव खोपडे यांनी धाडस दाखवलं. यादरम्यान दरोडेखोरांनी गोळीबार केला असता एक गोळी त्यांच्या हातात लागली होती. पण रक्तबंबाळ, थकलेल्या अवस्थेत त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.
दरोडेखोरांनी बसच्या काचेवर एकूण चार गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या खोमदेव खोपडे यांनी चुकवल्या. पण एक गोळी त्यांच्या हाताला लागली. प्रचंड वेदना आणि रक्तस्त्राव होत असतानाही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बसवरील आपलं नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली. गोळ्या आणि दरोडेखोरांना चकवा देत ते बस पळवत होते. अखेर सावडी गावाजवळ त्यांनी दरोडेखोरांना मागे टाकलं आणि अखेर तेवसा पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांनी खोमदेव खोपडे यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या धाडसामुळे सर्व भाविक सुरक्षित आहेत असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
खोमदेव खोपडे अमवरातीमध्ये अंबेमाता मंदिराजवळ थांबले होते. यानंतर त्यांनी नागपूरचा प्रवास सुरु केला होता. नांदगावपेठ टोलनाका ओलांडला असता त्यांना आपला पाठलाग केला जात असल्याचं जाणवलं. त्यांनी कारला ओव्हरटेक करण्यास दिलं असता, गोळीबार सुरु झाला.
अमरावती पोलिसांनी बसला सुरक्षेत नांदगावपेठ पोलीस ठाण्यात नेलं. तसंच खोमदेव खोपडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. हायवेवरील या दरोडेखोरांनी उत्तर प्रदेशचा रजिस्ट्रेशन नंबर असणारी कार नाशिकमधून चोरली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस याप्रकरणी तपास करत असून नागपूरच्या प्रवेशद्वावरील सर्व सीसीटीव्ही तपासत आहेत. यामधूनल हायवेवरील हे दरोडेखोऱ शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. फुटेजमध्ये वाहन शहराच्या दिशेने जात असल्याचे दिसत होते, परंतु नंतर गोंडखेरी टोल नाक्यावरून काम्पटी-कन्हण मार्गाने जबलपूर महामार्गाकडे जात होते.