धक्कादायक, तरुणाची हत्याकरुन दुचाकीला बांधून विहिरीत फेकले

हिंगणा तालुक्यातील सुकडी गावात एका तरुणाची हत्या करण्यात आली. 

Updated: Oct 7, 2020, 07:50 PM IST
धक्कादायक, तरुणाची हत्याकरुन दुचाकीला बांधून विहिरीत फेकले  title=
संग्रहित छाया

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सुकडी गावात एका तरुणाची हत्या करण्यात आली. हा तरुण कालपासून बेपत्ता होता. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली होती. दरम्यान, तरुणाच्या हत्येनंतर त्याला दुचाकीला बांधून मृतदेह शेतातील विहिरीत फेकल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हत्या करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव बंटी चिडाम आहे. बंटी हा काल दुपारपासून बेपत्ता होता. काल संध्याकाळी त्याच्या मित्रांनी त्याला शोधले. मात्र तो सापडला नाही. म्हणून रात्री उशिरा बंटी बेपत्ता असल्याची तक्रार हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. 

मात्र, आज सकाळी गावातील एका शेतात रक्ताचे डाग आणि कोणाला तरी ओढून विहिरीपर्यंत आल्याच्या खूणा जमिनीवर दिसल्याने विहिरीत काही तरी फेकले, असा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. आज पोलिसांच्या उपस्थितीत त्या विहिरीत शोध घेतले असता बंटी चिडाम हा दुचाकीसह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.