प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : एक आजी वयाच्या ९५ व्या वर्षी ही कुंभारकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. गेल्या ६० वर्षांपासून कुंभारणीचं हे चाक अखंड फिरतं आहे. गुहागरच्या पालपणे गावात कुंभारकाम करणाऱ्या या आजींचं नाव आहे रुक्मिणी नांदगावकर. त्यांचं वय वर्षं फक्त ९५. पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर मातीला आकार देत अनेक प्रकारची मातीची भांडी त्या घडवतात.
जन्माला आल्यावर लागणाऱ्या पणतीपासून ते मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला लागणाऱ्या मडक्यापर्यंत... लग्नासाठी लागणारे करे, थंड पाण्याचं मडकं, माडी काढायचं मडकं, देवाची धुपारत, जेवणाची भोगवणे, मच्छिमार समाजाच्या लग्नात लागणारी आरा बोंडला भांडी... ५ रुपयांपासून १०० रुपये किंमतीची ही भांडी आजी घडवतात. अगदी या वयातही, कारण या आजींच्या कामावरच त्यांच्या संसाराचं चाकही चालतं आहे.
मुलगा दिव्यांग असल्यामुळं त्याला आईच्या कामात मदत करता येत नाही. तरीही जमेल तेवढा हातभार तो लावतो. गेली १५ वर्षं सुनबाई देखील आजींना कामात मदत करतात. ९५ व्या वर्षी मातीकलेत राबणारे हे हात गावातल्या तरुणांनाही सकारात्मक ऊर्जा देतात.
काळ बदलला... मातीच्या भांड्यांची जागा प्लास्टिक आणि धातूच्या भांड्यांनी घेतली. कुंभार व्यवसाय बंद पडत चालला आहे. पण हिंमत न हारता या वयोवृद्ध रुक्मिणी आजी अजूनही काळचक्रालाच आव्हान देत लढत आहेत.