नागपूर : गेल्या आठवड्यात पूर्व विदर्भात आलेल्या महापुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झालेय. पुरामुळं प्रभावीत झालेली वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने सुमारे १ लाख ३८ हजार ग्राहकांपैकी १ लाख २३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आलीय.
पुराचे पाणी कायम असलेल्या नागपूर ग्रामीण मंडल तसेच गडचिरोली मंडल अंतर्गत दुर्गम भागात असलेल्या सुमारे १५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरु करण्यात महावितरणला अडचणी येत आहे. वीज यंत्रणेची सर्वाधिक हानी भंडारा, नागपूर आणि गडचिरोली मंडळ अंतर्गत झाली आहे.
विदर्भातील नागपूर ग्रामीण ,भंडारा, ब्रम्हपुरी आणि गडचिरोली या भागात २९ ऑगस्टला आलेल्या पुरामुळे वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . महावितरणचे सर्वाधिक ३ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान भंडारा मंडळात झाले असून गडचिरोली मंडळा महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ३ कोटी २७ लाख रुपयांचे नुकसान झाले तर नागपूर ग्रामीण मंडलामध्ये नुकसानीचा आकडा २ कोटी ६८ लाख एवढा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणच्या मालमत्तेचे १५ लाखाचे तर अमरावती परिमंडळात ३ लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झालेय.यात बाधित रोहित्रांची संख्या ४ हजार ३३४ आहे. संपूर्ण विदर्भात पुरामुळे ६२५ गावे बाधित झाली होती.
वीज पुरवठा प्रभावित झालेल्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या गडचिरोली मंडलात असून तेथे सुमारे ८९ हजार ग्राहक प्रभावित झाले होते. भंडारा मंडलात २८ हजार तर नागपूर ग्रामीण मंडळात २० हजार ग्राहक प्रभावित झाले होते.