चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, शहापूर: भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.
सावरदेव पाडा हे शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातलं एक छोटंसं आदिवासीबहुल गाव... मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्थानकापासून अवघ्या १५ मिनिटांत या गावात पोहोचता येतं. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता, रिक्षा, टॅक्सी अशी सगळी सोय. मात्र तरीही या गावात अद्याप ना वीज पोहोचलीये, ना पाणी...त्यामुळं या गावातले आदिवासी नागरिक अजूनही विकासापासून हजारो मैल लांबच राहिलेत. सुमारे ४० ते ४५ घरं आणि जवळपास पावणे दोनशे लोकसंख्या असलेल्या या गावात काही घरात बॅटरी किंवा सोलर लाईट असले तरी एक-दोनच...
गावात पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. काही वर्षांपूर्वी एका संस्थेनं गावात बोअरवेल खोदून दिली, मात्र त्यावर हापपंप बसवला नाही. त्यामुळं अजूनही गावातल्या बायका पाण्यासाठी पायपीट करतात. या गावात ना वीज ना पाणी मग स्वयंपाकासाठी गॅस तर दूरच राहिला.
गावात जिल्हा परिषदेची असलेल्या एकमेव शाळेत जवळपास ६० ते ७० मुलं शिकतात. मात्र शाळेची अवस्था पाहिल्यावर इथं मुल कोणत्या परिस्थितीत शिकत असतील याची जाणीव होते. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे. आम्ही काय केलं याचे दाखले परदेशात जाऊन दिले जाताहेत. मात्र सावरदेव पाडा गावाची ही अवस्था पाहिल्यानंतर खरंच विकास हरवला आहे, असंच म्हणावं लागेल.