Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यामधील सावित्रीबाई फुले विद्यापिठातील ललित कला केंद्राच्या प्रमुखांसहीत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या नाटकावरुन तुफान राडा झाल्यानंतर पोलिसांनी आज अटकेची कारवाई केली आहे. ललित कला केंद्रात सादर करण्यात आलेल्या रामायणावर आधारित 'जब वी मेट' नावाच्या नाटकावरुन विद्यार्थी विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असा वाद शुक्रवारी रात्री विद्यापीठाच्या आवारातच झाला. या नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकार लक्ष्मण आणि सीतामातेच्या भूमिकेबरोबरच वैयक्तिक आयुष्यतील भूमिका साकारत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र या नाटकातील काही दृष्यांमध्ये हिंदू देवी देवतांची भूमिका साकारणाऱ्या पत्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद होते. याच संवादांवर अभाविपने आक्षेप घेत कलाकारांना मारहाण केली होती. तसेच पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणीही केलेली.
पोलिसांनी शुक्रवारी घडलेल्या प्रकरणासंदर्भात कारवाई करत हिंदूंच्या भावाना दुखावल्याप्रकरणी ललित कला केंद्राच्या प्रमुखांसहीत या नाटकाशीसंबंधित 6 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ललित कला केंद्रात विद्यार्थी असलेला नाटकाचा लेखक, दिग्दर्शक भावेश राजेंद्रनबरोबरच त्याच्या 4 सहकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ललित कला केंद्राचे प्रमुख प्राध्यापक प्रवीण भोळेंनाही या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
ललित कला केंद्रातर्फे आयोजित या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी नाटक सुरु अशतानाच आक्षेप घेतला. त्यांनी नाटकाचा प्रयोग उधळून लावला. विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली. या राड्यानंतर विद्यापीठामध्ये पोलीस तैनात करण्यात आले. या नाटकामध्ये गोंधळ झाला तेव्हाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील दृष्यांमध्ये रामायणातील पात्रांच्या वेशातील पात्र सध्याच्या भाषेत बोलताना दिसत आहेत. तसेच स्टेजवर असलेल्या सीता मातेचं पात्र साकारणी अभिनेत्री धुम्रपान करताना दिसत आहे. नाटकातील हा प्रसंग सुरु असतानाच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडलं.
नाटकातील संवाद ऐकून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचा आरोप करत नाटक बंद पाडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर चढून नाटक बंद पाडल्यानंतर एकच गोंधळ उडाली. ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना विरोध केल्याने थोडा वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या तरुणांनी एकमेकांना धक्काबुक्की केली
सदर नाटकामध्ये वादग्रस्त संवाद आणि प्रसंग होते असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविपने केला आहे. या नाटकाची संहित उपहासात्मक होती अशी माहिती समोर येत आहे. अभाविचे पुणे विद्यापीठातील प्रमुख शिव बरोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटकामध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री मंचावर धुम्रपान करताना आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता आक्षेपार्ह भाषा वापरताना दाखवण्यात आला होता.
बरोलेंनी दिलेल्या माहितीनुसार, या नाटकावर आम्ही आक्षेप नोंदवला आणि नाटक बंद पाडलं. हे नाटक हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे. आम्ही नाटक बंद पाडल्यानंतर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप बरोलेंनी केला. आम्ही या प्रकरणामध्ये पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीच्या आधारे अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.