पुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!

Zika Virus Pune: पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 8, 2024, 10:34 AM IST
पुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!  title=
5 more pregnant women test positive for Zika virus Pune tally now at 11

Zika Virus Pune: पुण्यात झिका व्हायरसने थैमान घातलं आहे.आत्तापर्यंत पुणे शहरात 5 गर्भवती महिलांना झिका विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळं शहरातील झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. झिकाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळं चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुंढवा, पाषाण आणि आंबेगाव बुद्रुक या परिसरात राहणाऱ्या  गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व महानगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

झिका हा एडीस डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. एनआयव्हीच्या पथकाने जुलै २०२१ मध्ये पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व परिंचे येथे दिलेल्या भेटीच्या वेळी झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता. पुणे शहरात आत्तापर्यंत 11 झिकाचे रुग्ण सापडले आहेत. तसंच, गर्भवती महिलांना झिकाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. 

झिका आजार कशामुळे पसरतो?

झिकाचा प्रादुर्भाव एडीस डासामुळे होतो. एडीस डासांचा प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हा आजार झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात जावे. कोणताही ताप अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पालिकेने काय अवाहन केलं?

डेंगी ,झिका, चिकन गुनिया या आजाराने डोके वर काढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरू केलय.सर्वेक्षणातून साचलेल्या पाण्यातून झिका डासाची उत्पत्ती होऊन आजार वाढत असल्याचे समोर आलय.नागरिकांनी स्वच्छ पाणी साफसफाई करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.