5 किडन्या विकणे आहे; नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लागले अजब बॅनर

सावकाराकडून पैसै वसूलीसाठी तगादा लावला जातो अशा बातम्या आपण बघतोच मात्र सावकारी जाचामुळे चक्क एका कुटुंबानं किडनी विकण्यासाठी जाहिरात लावली आहे. 

Updated: Oct 12, 2023, 11:11 PM IST
5 किडन्या विकणे आहे; नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लागले अजब बॅनर  title=

Nanded News : सावकारी कर्जाच्या जाचात अडकल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी एखाद्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि तो किती असहाय होतो, याचा प्रत्यय सध्या नांदेडकरांना पहायला मिळतोय. सावकारी कर्ज फेडण्यासाठी एका महिलेनं चक्क पाच किडनी विकणे आहे असं पोस्टर लावल आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर हे पोस्टर चिकटवण्यात आलेत. सावकाराच्या भीतीनं महिलेनं आपल्या कुटुंबियासह दोन वर्षांपासून घर सोडलंय.. त्यांनी लावलेलं पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सत्यभामा कुंचलवार यांनी लावले पोस्टर

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाईवरदड येथील सत्यभामा कुंचलवार यांनी हे पोस्टर लावलेत त्यांच्या कुटुंबात पती, दोन मुले आणि एक मुलगी, असे  पाच सदस्य आहेत. मागील तीन वर्षापूर्वी त्यांनी मुदखेडच्या खासगी सावकाराकडून दोन लाख रूपये कर्ज घेतलं होते. दरम्यानच्या काळात काही पैसे फेडलेही होते. मात्र, लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प झालं. त्यातच शेतीतूनही फारसे उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड त्या करू शकल्या नाहीत.

सावकारी जाचातुन सुटका कधी?

सावकारी जाच गावागावात आजही सुरुच आहेत. त्याची अनेक छोटी-मोठी उदाहरणं नेहमीच समोर आलीयेत..मात्र सावकारी जाचामुळे किडनी विकावी लागत असेल तर याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अशा खासगी सावकारांवर वचक बसणार कसा, हा प्रश्नच आहे. 

'किडनी घ्या, पण मला शाळा दत्तक द्या'

'किडनी घ्या, पण मला शाळा दत्तक द्या' अशी केविलवाणी मागणी एका नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांना केलीय. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. शासनाच्या शाळा दत्तक योजनेला सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटतोय. त्यातच आता माडगीतल्या जागेश्वर पाल यांनी ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं ती शाळा मला द्या, माझ्याकडे द्यायला पैसे नाहीत मात्र माझी किडनी हवी तर घ्या पण शाळा मला द्या असा अर्ज जिल्हाधिका-यांकडे केलाय. मराठी प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेत असल्यांचंही पाल यांनी म्हटलंय..त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा रंगतेय.