'शिवसृष्टी'साठी पुरंदरेंना सरकारकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द

पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय

Updated: May 12, 2018, 11:56 PM IST

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील आंबेगावमध्ये उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ५ कोटींची मदत घोषित करण्यात आली.  त्याचा धनादेश आज देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. शिव छत्रपती प्रतिष्ठाचे प्रमुख विश्वस्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे हा धनादेश सूपुर्त करण्यात आला. बाबासाहेबांच्याच संकल्पनेतून हा शिवसृष्टी प्रकल्प साकारला जात आहे. कात्रज - आंबेगावमधील २१ एकर जमीनीवर हा भव्य प्रकल्प साकारला जात आहे. केंद्र तसेच राज्य सरकारनं या प्रकल्पाला विशेष दर्जा दिलाय. 

दरम्यान, पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सरकारकडून त्यांच्या शिवसृष्टीसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. 

दरम्यान, यापुढे प्रतिष्ठानची धुरा त्यांनी जगदीश कदम यांच्याकडे सोपवल्याची घोषणा आज बाबासाहेब पुरंदरेंनी केली.