घराच्या गच्चीवर २०० झाडं; सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड

११०० स्केवर फुटांत फुलली २००हून अधिक झाडं...

Updated: Feb 29, 2020, 03:25 PM IST
घराच्या गच्चीवर २०० झाडं; सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड title=

पुणे : हल्ली भाजीपाल्याच्या बाबतीत उत्पादक ते ग्राहक म्हणजेच शेतीतला माल थेट घरात याची मोठी क्रेझ शहरांमधून दिसतेय. पण हा ग्राहकच उत्पादक बनला तर? पुण्यातल्या एका जोडप्याने एक जबरदस्त प्रयोग केला आहे.

शेवग्याच्या झाडाला लगडलेल्या लांब लांब शेंगा, निंबोणीला लागलेली रसदार लिंबं, हिरवी आणि काळी मोठ्ठी मोठ्ठी वांगी, याशिवाय पानकोबी, फुलकोबी, हिरव्या मिरच्या, रंगीत मिरच्या, कांदा, मुळा असे कितीतरी प्रकार या बागेत पाहायला मिळतात. बिल्डिंगच्या गच्चीवर फुलवण्यात आलेली छान शेती आहे. केवळ भाजीपाला नाही तर चिकू, आंबा, स्ट्रॉबेरी अशी फळबागही इथे बहरली आहे.

प्रभात रस्त्यावरच्या श्री आणि सौ दिवाण यांनी ही किमया साधली आहे. अकराशे स्केवर फुटांच्या गच्चीवर त्यांनी सुमारे २०० हुन अधिक प्रकारची रोपं वाढवली आहेत. त्यात औषधी आणि मसाल्यांच्या वनस्पतींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने ही शेती फुलवली आहे. 

या शेतीसाठी एक मुठ देखील माती वापरण्यात आलेली नाही. झाडांचा पालापाचोळा, घरातला ओला कचरा, उरलेले अन्न पदार्थ यांपासून बनवलेल्या खतांवर ही रोपं वाढवण्यात आली आहेत. 

गच्चीवरचे हे शेतीचे प्रयोग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिवाण यांचा प्रयत्न आहे. यातून स्वतःच्या गरजा भागवण्याबरोबरच प्रदूषण मुक्ती, पर्यावरण रक्षण होणार आहे. आणि या सगळ्याच्या जोडीला मिळणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती करण्याचं समाधानही आहे.