मुंबई: तुम्ही जर आई-बाबा असाल, तर इकडे नक्की लक्ष द्या. तुमच्या लहान मुलांकडे नीट लक्ष ठेवा. थोडंसं दुर्लक्ष झालं तर काय घडू शकेल याच्या धक्कादायक दोन घटना एकाच दिवशी घडल्या आहेत.अशाच झुलणा-या झोक्यानं या चिमुरडीचा जीव घेतला आहे. फोटोत दिसणारी ही ८ वर्षांची लहानगी सुमैय्या. पिंपरीतल्या रुपीनगरमध्ये राहात होती. आई-बाबा बाहेर गेलेले असताना सुमैय्याला झोका खेळण्याची इच्छा झाली. तिनं ओढणीचा झोका केला आणि झोके घेऊ लागली.
खेळता खेळता तिला ओढणीचा फास लागला. सुमैय्याच्या बहिणीनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. असाच चटका लावणारा चिमुरड्याचा मृत्यू चेंबूरमध्ये झाला आहे.
घरातल्या पाण्याच्या बादलीत पडून चार वर्षांच्या देवांशचा जीव गेला. देवांशची आई दुकानात गेली होती. देवांश पाण्यानं भरलेल्या पिंपाजवळ खेळत होता. खेळता खेळता त्याचा तोल गेला आणि तो पिंपात पडला. देवांशला सायन रुग्णलयात दाखल केलं, पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याआधीही मजल्यावरुन पडून, फुगा तोंडात गेल्यानं, गुलाबजामच्या पाकात पडून चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनो, डोळ्यांत तेल घालून तुमच्या चिमुकल्यांवर लक्ष ठेवा.