औरंगाबादेत व्यापाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण; दुकाने उघडण्यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य

आजपासून औरंगाबाद जिल्हा पुन्हा अनलॉक झाला होता. 

Updated: Jul 19, 2020, 08:48 PM IST
औरंगाबादेत व्यापाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण;  दुकाने उघडण्यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असूनही औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात १८४ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये चिकन, मटण आणि किराणा मालाची दुकाने चालवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महानगरपालिकेने दुकान उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

धक्कादायक! राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ

आजपासून औरंगाबाद जिल्हा पुन्हा अनलॉक झाला होता. महानगरपालिकेने शनिवारी झालेल्या पत्रकारपरिषदेतच लॉकडाऊन आणखी वाढवला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, जिल्ह्याता अँटीजेन टेस्ट वाढवणार असल्याचे औरंगाबादचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते. भाजी, फळं, दूध, सलून, चिकन, मटण या व्यापाऱ्यांची टेस्ट होईल पुढील दोन दिवसात होईल, असेही आयुक्तांनी सांगितले होते. 

कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली

यानंतर आज पहिल्याच दिवशी औरंगाबादमध्ये १८४ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारीही ८४ व्यापाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सध्या शहरात १५ ठिकाणी व्यापारी संघाने निश्चित केलेल्या ठिकाणी कोरोनाच्या टेस्ट सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून पुन्हा कोणते निर्बंध लादले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९५१८ रुग्ण आढळून आले. तर २५८ जणांचा मृत्यू झाला. आज मुंबईत १०३८ तर पुण्यात १८१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले.