बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर

बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

Updated: Jul 7, 2020, 08:07 AM IST
बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर title=
संग्रहित छाया

बुलडाणा : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. ७ जुलै ते २१ जुलै २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन करीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन समिती सभागृहात पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ उपस्थित होते.

जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा आणि मोताळा तालुक्यात यापूर्वीच १५ जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहे. या तालुक्यांमध्ये १५ जुलै नंतर २१ जुलै पर्यंत जिल्ह्याचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. मलकापूर उपविभाग वगळता या लॉकडाऊन कालावधीत सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शिंगणे यांनी दिली.

तसेच त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरित करण्यात येतील. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. जिल्ह्यात प्रशासनाने चांगले कार्य करीत, समन्वय ठेवत कोरोनाला नियंत्रित ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे, असे ते म्हणालेत.

प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव 

 बुलडाणा येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या लॅबचा अंदाजित खर्च १.५० कोटी रूपये आहे. तसेच डॉक्टरसह १० मनुष्यबळ  लॅबसाठी लागणार आहे. जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ व नागपूर येथे पाठविण्यात येत आहेत. पुढील काळात जालना येथे तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात येत असून याठिकाणी जिल्ह्यातील नमुने तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नमुन्यांचे निदान लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे जलद तपासणीसाठी २००० रॅपिड ॲन्टीजेंट टेस्ट किट जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या माध्यमातून ३० मिनिटांत निदान होणार आहे.

'विनाकारण कुणीही बाहेर पडू नये'

लॉकडाऊन काळात दुचाकीवर एक, चार आणि तीन चाकी वाहनांमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरु नये. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहऱ्यावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करावे. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाने स्वत:जवळ छत्री ठेवावी. जेणेकरून पावसापासून बचाव होईल व आपोआप सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन होईल.

आतापर्यंत ३८३२ नमुने तपासणी

जिल्ह्यात विदेशातून आलेल्या ३०२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सध्या गृह विलगीकरणात ३३५२ नागरिक असून संस्थात्मक विलगीकरणात ४८४ नागरिक आहेत. आयसोलेशनमध्ये ११८ नागरिक आहेत. आतापर्यंत ३८३२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यामध्ये ३०० पॉझिटिव्ह, ३१०६ निगेटिव्ह व ३७२ नमुने प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत १९० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १०५ प्रतिबंधीत क्षेत्र असून २० कमी झाले आहेत. सध्या ८५ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.