आशा उद्याच्या : १२ वर्षांच्या तनयनं बनवली इलेक्ट्रिक सायकल

यू-ट्यूब वर इलेक्ट्रिक सायकलचा व्हिडिओ पाहून आपल्या सायकलवर हा प्रयोग करण्याची कल्पना त्याला सुचली आणि आपल्या आजोबांच्या मदतीनं त्याने ती प्रत्यक्षात उतरवलीसुद्धा... 

Updated: Jun 5, 2018, 04:25 PM IST

अश्विनी पवार , झी मीडिया, पुणे : सुट्टीमधील फावल्या वेळात करायचं काय हा विद्यार्थी आणि पालकांच्या पुढे असलेला प्रश्न... मात्र, पुण्यातील तनय बुडातीने सुट्टीतला आपला वेळ सत्कारणी लावत पर्यावरण पूरक असा प्रयोग केलाय. सुट्टीमध्ये आपली लाडकी सायकल घेऊन मित्रांबरोबर भटकणं हा लहान मुलांचा आवडता छंद... याच छंदातून पुण्यातील तनय बुडातीने इलेक्ट्रिक सायकल बनवण्याचा हटके प्रयोग केलाय. अवघ्या १२ वर्षांच्या वयात तनयने ही किमया केलीय. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे शिकणाऱ्या तनयनं नुकतीची आठवीची परीक्षा दिलीय. यू-ट्यूब वर इलेक्ट्रिक सायकलचा व्हिडिओ पाहून आपल्या सायकलवर हा प्रयोग करण्याची कल्पना त्याला सुचली आणि आपल्या आजोबांच्या मदतीनं त्याने ती प्रत्यक्षात उतरवलीसुद्धा... 

इलेक्ट्रिक सायकल बनविण्यासाठी तनयने आपल्या सायकलला १२ व्होल्टच्या दोन बॅटरी आणि मोटर  बसविली आहे. एकदा ही सायकल चार्ज केल्यावर ती ६० ते ७० किलोमीटरचं अंतर कापू शकते... तीही साध्या सायकल पेक्षा जास्त म्हणजेच ४० किलोमीटर प्रतितास वेगाने...

वेळ वाचविण्यासाठी जसा दुचाकी आणि चार चाकीचा वापर अनिवार्य आहे तसंच जर पर्यावरण वाचवायचं असेल तर सायकल वापरणही काळाची गरज बनलीय...आणि तनयनं बनवलेली ही इलेक्ट्रिक सायकल या दोन्हीमध्ये साधलेला एक सुवर्णमध्यच म्हणता येईल.