कल्याण हत्याकांड: 8 दिवसांपासून पाठलाग, चाकू हल्ल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला पण...; पोलिसांची माहिती

12 Year Old Kalyan Girl Stabbed To Death: मंगळवारी सायंकाळी ही तरुणी क्लासवरुन आपल्या आईबरोबऱ घरी येत असतानाच इमारतीच्या आवारामध्येच तिच्यावर एका तरुणाने चाकूने अनेकदा वार केले. हा संपूर्ण घटनाक्रम अवघ्या काही क्षणांमध्ये घडला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 17, 2023, 04:28 PM IST
कल्याण हत्याकांड: 8 दिवसांपासून पाठलाग, चाकू हल्ल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला पण...; पोलिसांची माहिती title=
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे

12 Year Old Kalyan Girl Stabbed To Death: कल्याणमध्ये मंगळवारी रात्री तिसगाव परिसरामध्ये एका 12 वर्षीय मुलीची निघ्रृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या मुलीवर चाकू हल्ला करुन तिला संपवणारा आरोपी आदित्य कांबळेने हल्ल्यानंतर फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एका आठवड्यापासून आरोपी आदित्य या मुलीचा पाठलाग करत होता. पोलीस तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे. तिसगाव येथील दुर्गा दर्शन सोसायटीमधील ही मुलगी 16 ऑगस्टच्या सायंकाळी आपल्या आईबरोबर घरी जात असतानाच हा हल्ला झाला. ही मुलगी तिच्या आईबरोबर इमारतीच्या आवारामध्ये शिरली असता आदित्य या दोघींच्या समोरुन चालत आला. त्याने हातातील चाकूने या मुलीवर वार करण्यास सुरुवात केली. काही समजण्याच्या आधीच त्याने मुलीवर 7 ते 8 वार केले. 

आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण...

आदित्यने हल्ला करुन काही वार केल्यानंतर मुलीच्या आईने तिला वाचवण्यासाठी आरोपीला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मुलीच्या आईला धक्का दिला आणि तो मुलीवर वार करत राहिला. मुलीच्या आईने केलेला आरडाओरड ऐकून इमारतीमधील लोक मदतीला धावले. ही मुलगी आपल्या आईबरोबर क्लासवरुन घरी येत असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या या मुलीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच

दुसरीकडे हल्ला केल्यानंतर या तरुणाने फिनेल प्यायलं आत्महत्या करण्याच्या हेतूने आरोपीने फिनेल प्रशान केलं. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. इमारतीखाली अचानक जोरदार आवाज होऊ लागल्याने इमारतीमधील अनेकजण पटापट खाली उतरुन आले. इमारतीमधील रहिवाशांनीच या मुलीला तातडीने रुग्णालयात नेलं. इमारतीतील रहिवाशांमुळेच आरोपीला पकडता आलं.

प्रत्यक्षदर्शिंनी काय सांगितलं?

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, माय-लेक इमारतीच्या गेटमधून बोलत बोलत आत आल्यानंतर इमारतीच्या कंम्पाऊण्डजवळ लपून बसलेल्या या तरुणाने अचानक या मुलीवर हल्ला केला. या मुलीवर तरुणाने चाकूने वार केले. मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईने हल्लेखोराला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर या महिलेला बाजूला ढकलून मुलीवर चाकूने वार करत राहिला.

मुलीची आई रडत राहिली

आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. इमारतीमधील लोकांनी मुलीला रुग्णालयात नेलं तरी या मुलीची आई इमारतीखालीच रडत होती. या माहिलेला धीर देण्याचा प्रयत्न स्थानिक महिला करत होत्या. मात्र अचानक झालेल्या या हल्लामुळे गोंधळून गेलेल्या महिलेला नेमकं काय करावं हे कळत नव्हतं. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर सोसायटीत चाकू हल्ला करून हत्या झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.