Positive News : 105 वर्षाचे आजोबा आणि 95 वर्षाच्या आजीची कोरोनावर मात !

 वृद्ध दाम्पत्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे 8 दिवसात कोरोनाला सुद्धा पळ काढावा लागला.

Updated: Apr 28, 2021, 11:49 AM IST
Positive News : 105 वर्षाचे आजोबा आणि 95 वर्षाच्या आजीची कोरोनावर मात ! title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : 'वयोवृद्धांना कोरोनामुळे धोका होऊ शकतो', हे सर्रास वापरले जाणारे वाक्य नव्वदी पार केलेल्या वृद्ध दाम्पत्याने मोडीत काढले आहेत. लातूरच्या तब्बल 105 वर्षाचे आजोबा आणि 95 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. या वृद्ध दाम्पत्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे 8 दिवसात कोरोनाला सुद्धा पळ काढावा लागला.

कोरोनाला घाबरून आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण दुर्दम्य ईच्छाशक्ती असेल तर कोरोनाला हरवणं शक्य आहे. 105 वर्षाच्या आजोबांनी आणि त्यांच्या ९५ वर्षाच्या पत्नीने हे सिद्ध केलंय. लातूर तालुक्याच्या काटगाव जवळील कृष्णानगर तांडा येथे १०५ वर्षाचे धेनु चव्हाण आणि त्यांच्या ९५ वर्षाच्या पत्नी मोताबाई चव्हाण राहतात.  

या दोघांनीही कोरोनाला नुकतंच हरवलंय. गेल्या महिन्यात 24 मार्चला हे दोघे पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

या दोघांनाही ना डायबिटीज, ना ब्लड प्रेशर, ना कुठली मोठी व्याधी. त्यामुळे उपचार करणे अधिक सुलभ झाले. आणि अवघ्या 8 दिवसात या जिगरबाज दाम्पत्याने भल्या-भल्यांना हैराण केलेल्या कोरोनाला पळवून लावलं.

कोरोनाची लक्षणे आढळताच आपल्या आई-वडिलांची तात्काळ कोरोना चाचणी केली. त्यानंतर रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार झाल्यामुळेच त्यांनी या वयातही कोरोनावर मात केली. 

विशेष बाब म्हणजे हे दाम्पत्य शुद्ध शाकाहारी आहेत. रुग्णालयातील औषधांच्या थोडा शक्तपणा असला तरी जगण्याची उमेद कायम असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. 

साधी राहणीमान असलेले हे दाम्पत्य सकाळी लवकर उठतात. वेळेवर जेवण, शेतात चक्कर मारणे आणि रात्री वेळेवर झोप ही साधी दिनचर्या या दाम्पत्याची आजही कायम आहे. 

4 मुली, 4 मुलं, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार चव्हाण कुटुंबियांना आहे. आपणास किंवा आपल्या नातेवाईकास, मित्रास कोरोना झालाच असेल तर त्यांनी यातून सकारात्मकता घ्यायला हवी.