100 घुंगरुवाली ‘नागीण’ चप्पल; साताऱ्याचा मेंढपाळ सोशल मीडियावर चर्चेत

सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जांभुळणी येथील मेंढपाळाची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा होतेय.

Updated: May 13, 2022, 07:45 PM IST
100 घुंगरुवाली ‘नागीण’ चप्पल; साताऱ्याचा मेंढपाळ सोशल मीडियावर चर्चेत title=

सातारा : सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जांभुळणी येथील मेंढपाळाची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा होतेय. या मेंढपाळाचे नाव केराप्पा कोकरे असं असून वय 60 वर्ष इतकं असलेल्या या मेंढपाळाची चर्चा जोरदार होतेय. 

मेंढपाळ असल्यामुळे केराप्पा यांचे रोजचे जीवन शेतामध्ये त्यांच्या मेंढ्याबरोबर व्यतीत होत असते. धोतर, शर्ट, पागोटे असा त्यांचा ग्रामीण पेहराव पण यासोबतच त्यांची चर्चा होते तो त्यांच्या आगळ्यावेगळ्या चप्पलेमुळे..

ही खास चप्पल त्यांनी अकलूज येथून तयार करून घेतली आहे. त्याची किंमतही थोडी थोडकी नाही तर तब्बल 31 हजार रुपये आहे. या आपलेसे वैशिष्ठ म्हणजे त्यांच्या या चप्पलमध्ये 10 एलईडीलाईट्स, 100 घुंगरु, गोंडे, नटबोल्ट, काचेच्या टिकल्या, बॅटरी असं साहित्य वापरण्यात आलेय.

केराप्पांना लहानपणापासूनच अशा वेगवेगळ्या चप्पला वापरायला आवडतात. आता त्यांचं वय झालं असलं तरी त्यांची वशेषभुषा अगदी उत्तम असते. आपल्या या महागड्या चप्पलेची ते अतिशय काळजी घेतात.

आपल्या आवडत्या चप्पलेला रोज अत्तर लावून व्यवस्थित पुसणं हे त्यांचं दररोजच आवडतं काम. ही चप्पल घालून ते कुठेही गेले तर त्यांना वागणूक मिळते ती सेलिब्रिटीची. ही चप्पल साधी सुधी नाही तर तिची ठेवणच अशी केली आहे की केराप्पा ज्यावेळी ही चप्पल घालून जातात त्यावेळी एखादी नागीण रस्त्यावर हलत डुलत चालली असल्याचा भास होतो.

रात्री या चप्पलेमध्ये असणारी बॅटरी चालू केली की यातील 10 एलईडीलाईट्स झळाळतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही ते बिनधास्त प्रवास करतात. या चप्पलेमुळेच आपल्याला खरी ओळख मिळाल्याचे केराप्पा सांगतात.