अल्पवयीन मुलीवर हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याकडून अतिप्रसंग

संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Updated: Feb 27, 2020, 03:05 PM IST
अल्पवयीन मुलीवर हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याकडून अतिप्रसंग  title=

यवतमाळ : यवतमाळमध्ये लग्न सोहळ्यानिमित्त हॉटेलमध्ये थांबलेल्या एका १० वर्षीय चिमुकलीवर हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याने बळजबरी करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे. अक्षय चांदेकर असे आरोपीचे नाव आहे.

अक्षयने चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये एकांतात नेले. याठिकाणी त्याने चिमुकलीवर जबरदस्ती करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेली चिमुकली त्याच्या तावडीतून सुटका करत पळाली आणि तिने सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. कुटुंबीयांनी आरोपीला पकडून लोहारा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घडलेला प्रकार त्यात चित्रित झाल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, महिला, मुलींवर होणारे अत्याचार काही थांबायचं नाव घेत नाहीत. वर्ध्यातील हिंगणघाट, औरंगाबादमधील सिल्लोड जळीतकांड प्रकरणानंतर, मुंबईतील एका तरूणीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला. तरूणीला माटुंगा रेल्वे स्थानकावर छेडछाड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मात्र समोर कोणी येऊन तक्रार न केल्याने आरोपीला सोडून देण्यात आलं होतं. हे आरोपी मोकाट राहिले आणि यांना धडा शिकवला नाही तर हे असंच कृत्य करतील यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी या छेड काढणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आणि चांगलाच चोप दिला. याचा व्हिडियो त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता.

जानेवारी महिन्यात कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीडीत महिला रात्री ११च्या सुमारास पायी जात असताना बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली. मात्र असे वारंवार होणारे प्रकार, ही विकृती कधी थांबणार हा प्रश्न सामन्यांकडून विचारला जात आहे.