Gudi Padwa 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक सणाला आपलं असं महत्त्व असून त्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. हिंदू धर्मातील हे सण कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित आहेत. एवढंच नाही तर या सणाच्या दिवशी देवासाठी खास नैवेद्य करण्यात येतो. त्या नैवेद्यामागेही विशेष कारण असतं. मंगळवारी 09 एप्रिल 2024 ला गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येणार आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्या प्रतिपदा म्हणजे हिंदू नवं वर्ष म्हणजे मराठी नूतन वर्ष साजरा करण्यात येतो. (Why is Shrikhand puri eaten on Gudi Padwa 2024 srikhand are the health aayurveic benefits)
महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी विजयाची गुढी म्हणजे बांबू, त्यावर रेशमी वस्त्र, आंबे आणि कडुनिंबाची कोवळी पाने, साखर बत्ताशाची माळ आणि त्यावर तांब्याचा कलश उभारली जाते. बत्ताश प्रसाद तर कडुनिंबाची चटणी खाण्याची परंपरा आहे. त्यासोबत यादिवशी मराठी घरांमध्ये श्रीखंड पुरीचा बेत करण्याची परंपरा आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का? होळीसाठी पुरणपोळीचं नैवेद्य असतो मग गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा नैवेद्य का केला जातो. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत. आयुर्वेदात श्रीखंडला रसाला किंवा शिखरिणी असं म्हटलं जातं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, श्रीखंडाचा संबंध हा महाभारतासोबत आहे. अशी आख्यायिका आहे की, भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा सर्वप्रथम त्यांनी श्रीखंड बनवला होता. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप लागली. यामुळे श्रीच्या दैनंदिन व्यवहारात खंड पडला म्हणून या पदार्थचं नाव श्रीखंड पडलं.
उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी गुढीपाडव्याला श्रीखंडाच सेवन केलं जातं. उष्णते पासून शरीराला थंडावा आणि आराम मिळावा म्हणून श्रीखंडचं सेवन करावं. श्रीखंड खाल्ल्यामुळे कॅल्शिअम, लॅक्टीक ऍसिड आणि विटॅमिन बी आपल्याला मिळतो. त्याशिवाय दह्यामुळे त्वचा मऊ होते, केसातला डॅंड्रफ कमी होण्यास मदत मिळते. पोट बिघडलं असल्यास ताजं श्रीखंड खाल्ल्यास फायदा मिळतो. श्रीखंड खाल्ल्याने आतड्यांतील बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास फायदा होतो. लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर श्रीखंडाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं, असं आयुर्वेदात सांगण्यात आलंय. त्यासोबत दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असते. जे हाडे आणि दात निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)