घरात जर एखादे झुरळ दिसले तर आपली फार चिडचिड होते. त्यात खासकरून किचनमधील त्यांचा वावर तर किळसवाणा वाटतो. दिवसा घरातील कोपरे, भेगा यामध्ये लपलेली झुरळं रात्रीच्या वेळी बाहेर पडून घरभर वावरत असतात. त्यामुळेच रात्री बाहेर पडणाऱ्या या झुरळांवर नियंत्रण मिळवायचं कसं ही प्रत्येकासाठी डोकेदुखी असते. पण झुरळं रात्रीच्या वेळीच बाहेर का पडतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
झुरळं ही फोटोफोबीक असतात, म्हणजेच ते प्रकाशाला टाळत असतात. जर प्रकाशात बदल झाला तर त्यांना तो लगेच जाणवतो. अंधारात त्यांना फार सुरक्षित वाटत असल्याने ते त्यालाच प्राधान्य देतात.
झुरळामध्ये इतर प्राणी, पक्ष्यांप्रमाणे जगण्याची कला निर्माण झालेली असते. ज्यांच्यापासून धोका आहे असे पाळी, पक्षी हे दिवसा जास्त सक्रिय असतात. यामुळेच झुरळं दिवसा बाहेर पडणे टाळतात.
या किटकाला दिवसा असणारे उष्ण तापमान सहन होत नाही. दिवसाच्या तुलनेत त्यांना रात्रीच गार तापमान सहन होते.
झुरळं रात्रीच्या वेळीच अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अंधाराचा फायदा घेत ते किचनमधील खाली पडलेल्या, उरलेल्या अन्नावर ताव मारतात.
झुरळाला रिप्रोडक्शन आणि मेटिंग यासाठी रात्री योग्य स्थिती असते. त्यांनी रात्रीच्या वेळी रिलीज केलेले फेरोमोन्स अंधारात जास्त प्रभावशाली असतात ज्यामुळे रिप्रोडक्शनची शक्यता वाढते.
घरामध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल करणे, स्वच्छता ठेवणे, अन्न उघड्यावर न ठेवता ते सुरक्षित ठेवणे, ट्रैप लावणे असे अनेक उपाय तुम्ही झुरळं कमी करण्यासाठी करू शकता.