आपल्या मुलाने भविष्यात एक चांगला माणूस बनून समाजात नाव कमवावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. यासाठी पालक आपल्या मुलांचे संगोपन करताना अतिशय सावध असतात. किशोर वय हे मुलांचे भविष्य ठरवते. या वयात मुलांचे संगोपन खूप काळजीपूर्वक केले पाहिजे. कधी कधी पालकांची छोटीशी चूक मुलाचे भविष्य अंधारात टाकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या संगोपनात निष्काळजी राहू नये. यासाठी इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्याकडून काही पालकत्व टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या किशोरवयीन मुलांचे संगोपन करू शकता.
सुधा मूर्ती सांगतात की, मुलांद्वारे आपली स्वप्ने पूर्ण करू नयेत. त्या पुढे सांगतात की, मुलांच्याही काही इच्छा असतात. प्रत्येक पालकांनीही आपल्या मुलांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रात त्यांना साथ दिली पाहिजे.
सुधा मूर्ती यांच्या मते, तुमच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तुमचे मूल जसे आहे तसे चांगले आहे. त्याच्याजवळ असलेल्या गुणांचीही प्रशंसा केली पाहिजे.
आजकाल मुलांचा बहुतांश वेळ स्क्रिन पाहण्यात जातो. मुलांची ही सवय चांगली नाही. सुधा मूर्ती म्हणतात की, किशोरवयीन मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवले पाहिजे. शक्य असल्यास मुलांना पुस्तके वाचण्याचा सल्ला द्यावा. पुस्तकांमधून भरपूर माहिती मिळते आणि ज्ञानाचा विस्तारही होतो.
सुधा मूर्ती सांगतात की, पालकांनी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. मुलांचे ऐकले आणि समजून घेतले पाहिजे, असे त्या सांगतात. घरामध्ये असे वातावरण तयार केले पाहिजे की, मुलं आपले विचार पालकांसोबत बिनदिक्कतपणे मांडू शकेल. असे केल्याने मूल तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. तसेच, जेव्हा मुलाला पालकांकडून कोणत्याही सल्ल्याची आवश्यकता असेल तेव्हा तो त्याच्या भावना पालकांशी शेअर करू शकेल.
मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे बहुतेक पालक असतात, पण असे केल्याने मूल हट्टी होते. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यापेक्षा त्यांना पैशाची किंमत समजायला हवी. असे करून ते सर्वकाही घेण्याचा हट्ट करणार नाहीत. एवढंच नव्हे तर मुलांशी घरातील परिस्थिती शेअर करा. पालकांनी मुलांना नैतिकता शिकवावी आणि सामाजिक मूल्ये समजावून सांगावीत. पालकांनी केलेले असे संगोपन त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करू शकते.