बदलत्या जीवनशैलीनुसार राहणीमानात आणि नातेसंबंधातही बदल होताना दिसत आहे. लग्न उशिरा करणारी पिढी आता NO KIDS या मतावर येऊन थांबली आहे. कोणतेही वैद्यकीय समस्या नसतानाही मुलं होऊ न देण्याचा निर्णय अनेक कपल्स घेताना दिसतात.
नुकतंच, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका मुलाखतीत सांगितलं की, ''आपल्याला मुलं नको आहे. आम्ही हा निर्णय खूप विचार करुन घेतल्याचं प्रार्थना सांगते. आमच्याकडे पाळीव प्राणी आहेत, ती आमची मुलं आहेत. आम्ही त्यांचा मुलांसारखा संभाळ करतो. प्रार्थनाच्या या वक्तव्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या DINK ही संकल्पना अधोरेखित झाली आहे. DINK आणि NO KIDS हे दोन शब्द सध्या चर्चेचा विषय आहेत. तर या लेखात आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
प्रार्थना बेहेरेने 2014 मध्ये अभिषेक जावकरशी लग्न केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर प्रार्थनाने सासरच्या मंडळींसोबत अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तेथे प्रार्थना आणि अभिषेककडे कुत्रे, मांजरी, घोडे असे अनेक प्राणी पाळले आहेत.
“माझ्या नवऱ्याला आणि मला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे आम्हाला मूल नको असं आम्ही ठरवलं. आता आमच्या घरी जे प्राणी आहेत ती सगळी आमची मुलं आहेत आणि आम्ही दोघंही त्या सगळ्यांची खूप जास्त काळजी घेतो, त्यांना सांभाळतो. मूल होऊ न देण्याचा निर्णय मोठा होता पण, यात आमच्या घरच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला, समजून घेतलं.” असं प्रार्थना सांगते.
DINK म्हणजे Dual Income No Kids. या संकल्पनेत कपल दोघेही कामाला असतात पण त्यांनी मुलं न होण्याचा ठरवून निर्णय घेतलेला असतो. या कपल्सच्या जीवनात मुलांचं संगोपन हा प्रश्न नसतो. या संकल्पनेत कपल त्यांच्या करिअरवर फोकस करतात. फिरणे आणि मुलांशिवाय जीवनाचा आनंद घेणे ही संकल्पना आहे. पालकत्वाची कोणतीही जबाबदारी नसताना खासगी आयुष्य आणि करिअर यामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करतात.