Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी

हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. 

Updated: Mar 15, 2024, 03:23 PM IST
Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी title=

भारतातील विविध राज्यात विविध होळीच्या आख्यायिका सांगितल्या जातात. प्रत्येक राज्याची भौगोलिक, सांस्कृतिक रचनेनुसार होळी साजरी करण्याची पद्धत आणि परंपरा ही वेगवेगळी आहे. जाणून घेऊयात भारतात विविध राज्यात होळी कशी साजरी केली जाते.

महाराष्ट्रात साजरी होणारी होळी


हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होलिका दहन झाल्यावर येणाऱ्य़ा दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाते. एकमेकांना रंग लावून जुन्या वर्षाची सांगता आणि नविन वर्षाचं स्वागत करण्याचा उत्सव म्हणून महाराष्ट्रात होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रातल्या काही भागात याला धुळवड असेही म्हटलं जातं. काही खेडेगावांत  होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर धुळवडीला मटण खाण्याची परंपरा आहे. 

मथुरेतील होळी 


श्रीकृष्णाची जन्ंमभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरेला हिंदू धर्मात अनंन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रीकृष्णाच्या मथुरेत होळीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी वृंदावन  आणि मथुरेसह उत्तर प्रदेशमधील सर्व मंदिरांना सजविण्यात येतं. असं म्हटलं जातं की, गोकुळात श्रीकृष्ण गोपिकांसोबत रंग खेळ असे म्हणूनच रंगपंचमीला इथे मोठा  उत्सव साजरा केला जातो. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर येथे आठवडाभर फुलांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात येते. बांके बिहारी मंदिरात होणारा होळीचा उत्सव हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. 

पंजाबमधील होळी


शीख धर्म आणि भांगडा या व्यतिरीक्त पंजाबची वेगळी ओळख सांगणारा सण म्हणजे होला मोहल्ला. हिंदू धर्मातील होळीप्रमाणे शीख बांधव  होला मोहल्ला हा सण साजरा करतात. हा सण तीन दिवस सादरा करण्यात येतो. या तीन दिवसात शीख घोडेस्वारी करतात , रंग खेळतात  तसंच भांगडा नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम करत मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करतात. शीख धर्मिय बांधवांना पराक्रम गाजवण्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे ते आपल्या लष्करी बांधवांच्या शौर्यगाथा सांगतात. 

राजस्थानातील होळी


हिंदूच्या राजघराण्यांचा इतिहास सांगणार राज्य म्हणजे राजस्थान. येथील अजमेर, उदयपुर, पुष्कर, बीकानेर आणि जयपुर या शहरांत होणारा होळीचा उत्सव  पाहणं पर्वणी आहे. लोकपरंपरा जपत राजस्थानी नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम होळीच्या दिवशी केले जातात. 

केरळमधील होळी 


भारताच्या उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही होळीच्या सणाला महत्त्व दिले जाते. चैत्र महिना सुरू होण्याच्या काळात आणि वसंत ऋतूचं आगमन झाल्याने शेतात पिक येणाचा हा हंगाम असतो. निर्सगाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तयार होत आलेले धान्य  यज्ञात अर्पण केले जाते. केरळमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.