होळी खेळताना डोळ्यात रंग गेलाय? तर लगेचच हे प्राथमिक उपाय करुन पाहा

Holi Eye Care Tips: होळी खेळताना त्वचेची आणि केसांची जशी काळजी घेतली जाते तशीच आपल्या डोळ्यांचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काय करावं यासाठीच्या टिप्स   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 25, 2024, 06:24 PM IST
होळी खेळताना डोळ्यात रंग गेलाय? तर लगेचच हे प्राथमिक उपाय करुन पाहा title=
holi eye care tips First aid to do if colors go into eyes tips in marathi

Holi Eye Care Tips: आज देशभरात होळीच्या उत्साहाला उधाण आले आहे. धुळवड साजरी करत असताना स्वतःकडे लक्ष देणे शक्य होतंच नाही. चेहऱ्यावरील रंग लगेचच जावा यासाठी काहीजण आधीपासूनच काळजी घेतात. चेहऱ्यावर मॉइश्चुरायजर लावतात तर हाताला तेल लावून रंग खेळायला जातात. तर केसांनाही तेल लावून जातात. जेणेकरुन रंग लागला तरी तो लगेचच जाईल. पण रंग खेळत असताना तो डोळ्यात जाणार नाही, याची काळजी पण घ्यावी लागते.अनेकदा आपणच होळी खेळण्यात इतके मग्न असतो की रंग डोळ्यात जाण्यापासून वाचवणे मुश्कील असतो. अशावेळी रंग डोळ्यात गेला तर काय करावं, याच्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

होळीला खेळण्यात येणारे प्रत्येक रंग हे नैसर्गिक असतीलच असे नाही. काही रंगामध्ये हानिकारक तत्वे मिसळलेले असतात. रासायनिक घटक असल्यामुळं हे रंगही शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळं जर हे रंग डोळ्यात गेले तर जळजळ होऊ शकते. तसंच, अन्य गंभीर समस्याही उद्भवू शकता. त्यामुळं डोळ्यात रंग गेल्यावर लगेचच हे प्राथमिक उपाय करुन पाहा.

डोळे चोळू नका

डोळ्यात रंग गेल्यास डोळे चोळण्याची चुकी कधीच करु नका. यामुळं डोळ्यांची जळजळ अधिक वाढेल आणि गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोकाही वाढू शकतो. 

थंड पाण्याने साफ करा

स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते. लगेचच डोळे धुतल्यास डोळ्यातील रंग पूर्णपणे बाहेर येतो. 

लुब्रिकेटिंग आय ड्रॉप टाका 

जर तुमच्याकडे लुब्रिकेटिंग आय ड्रॉप असतील तर लगेचच डोळ्यात टाका. यामुळं जळजळ कमी होते आणि डोळ्यातील कचरादेखील साफ होतो. 

लगेचच मेडिकल हेल्प घ्या

डोळे साफ केल्यानंतरही डोळ्यात जळजळ होत असेल किंवा रेडनेस वाटत असेल, डोळ्यातून पाणी येणे, खाज येणे अशा समस्या होत असतील तर लगेचच डॉक्टरांना दाखवा.

डोळ्यांची काळजी घ्या

होळी खेळताना जर तुम्ही कॉन्टेक लेन्स लावल्या असतील तर त्या लगेचच काढून टाका.शक्यतो रंग खेळताना डोळ्यावर गॉगल लावा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)