तेच तेच श्रीखंड खावून कंटाळलात? घरच्या घरी ट्राय करा 'या' 5 नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड

Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याला तेच तेच श्रीखंड खावून वैतागलात? या नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड करुन पाहा

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 8, 2024, 05:18 PM IST
तेच तेच श्रीखंड खावून कंटाळलात? घरच्या घरी ट्राय करा 'या' 5 नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड title=
Gudi Padwa 2024: how to make diffrent flavours of Shrikhand at home

Gudi Padwa 2024: गुढीपाडवा म्हणजे नव वर्ष. हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारावर गुढी उभारली जाते. तर, सणाच्या दिवशी गोडा-धोडाचा स्वयंपाक करण्याची प्रथा असते. काही जण गुढीपाडव्याला पुरणपोळी, खीर करतात तर मात्र या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा बेत असतो तो श्रीखंड-पुरीचा.श्रीखंड-पुरी डाळ, भात, बटाट्याची भाजी, पापड, कुरडया असा फक्कड बेत गुढीपाडव्याला केला जातो. श्रीखंड हे बाहेरुन आणलं जातं. पण तुम्ही घरातही तुमच्या आवडीनुसार व फ्लेव्हरनुसार श्रीखंड तयार करु शकता. घरच्या घरीही घरगुती पद्धतीने तुम्ही श्रीखंड बनवू शकता. गोड फळांचा वापर करुन ते अगदी चॉकलेट फ्लेव्हरचे श्रीखंडही करु शकता. घरच्या घरी श्रीखंड कसे बनवायचे याची रेसिपी

श्रीखंड कसे बनवाल?

श्रीखंडासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या. 

दही (घरी चक्का बनवण्यासाठी), वेलची पावडर, किसलेले जायफळ, 150 ग्रॅम पिठी साखर, केशर, सुका मेवा,

चक्का कसा बनवाल?

सर्वात आधी घरात चक्का बनवण्यासाठी दह्याचे विरजण लावा. दही झाल्यानंतर एका सुती कपड्यात ते बांधा आणि दह्यातील सर्व पाणी निघून जाईल अशा रितीने त्याची पुरचुंडी बांधून ठेवा. साधारण सात ते आठ तास दही बांधून ठेवा. दह्याचा मस्त चक्का झालेला तुम्हाला दिसून येईल. सुती कपड्यात दही बांधल्यास चक्का आंबट होत नाही. 

एकदा का चक्का तयार झाला की त्याचे तुम्हा आरामात श्रीखंड बनवू शकाल. चक्का आंबट झाला असल्यात त्यात पीठीसाखरेचे प्रमाण वापरुन प्रमाण समान करुन घ्या.

श्रीखंडाचे फ्लेव्हर

केसर पिस्ता श्रीखंड

वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये श्रीखंड बनवण्यासाठी सर्व प्रथम चक्का घेऊन त्यात पीठीसाखर टाका व मिश्रण फेटून घ्या. पीठीसाखर पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर त्यात वेलची पूड, दूधात भिजवलेले केसर, बारीक चिरलेला पिस्ता हे सर्व टाकून एकजीव करुन घ्या. 

स्ट्रॉबेरी फ्लेव्हर श्रीखंड

चक्का आणि पिठीसाखर यांच्या मिश्रणात घरी बनवलेला स्ट्रॉबेरी पल्प आणि स्ट्रॉबेरीच्या बारीक केलेल्या फोडी टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या. 

टुटी-फ्रुटी श्रीखंड 

चक्का आणि पिठीसाखर हे एकत्र फेटून मिश्रण तयार करुन घ्या त्यानंतर यात वेलची पावडर, जायफळ पावडर, काजू-बदाम बारीक करुन एकजीव करुन घ्या. त्यानंतर यात टुटी-फ्रुटी टाकून घ्या. 

चॉकलेट श्रीखंड 

चॉकलेट हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे. चॉकलेट श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजारात मिळणारे च़ॉकलेट बार घ्या. मायक्रोव्हेव्हमध्ये हे चॉकलेट वितळवून घ्या. त्यानंतर चक्का आणि पिठीसाखरेच्या मिश्रणात हे वितळलेले चॉकलेट घालून सर्व नीट एकजीव करुन घ्या. त्यानंतर त्यावपुन बदाम किंवा काजू बारीक चिरुन घाला. 

आम्रखंड 

एप्रिल महिन्यापासून आंब्याची बाजारात चाहुल लागते. लहान मुलांना आवडणाऱ्या आंब्याचेही तुम्ही आम्रखंड बनवू शकतात.त्या साठी चक्का आणि पिठीसाखरेच्या मिश्रणात आंब्याचा रस किंवा पल्प टाकून चांगले एकजीव करुन घ्या. त्यानंतर वरुन सजावटीसाठी पिस्ता किंवा काजु बारीक करुन घाला.