Dhantrayodashi 2023 : दिवाळीचा हा सण जवळ येत आहे. अगदी दोन दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीशिवाय लोक झाडू, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. या खास दिवशी या खास वस्तू का खरेदी केल्या जातात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील पौराणिक श्रद्धा काय आहे हे या लेखात जाणून घेणार आहोत.
कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दोन दिवसांनंतर अमावस्येला दिवाळी साजरी होते. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी देवी लक्ष्मीसोबत भगवान धन्वंतरीचीही पूजा केली जाते. समुद्रमंथन झाल्यावर भगवान धन्वंतरी सोन्याचा कलश घेऊन बाहेर पडले, अशी हिंदू धर्माची श्रद्धा आहे. बाहेर पडल्यानंतर दोन दिवसांनी आई लक्ष्मी प्रकट झाली. याच कारणामुळे धनत्रयोदशीची पूजा आधी होते आणि लक्ष्मीपूजन किंवा दिवाळी दोन दिवसांनी होते. धन्वंतरीला रोगांची देवता असेही म्हणतात. आपल्या जवळच्या व्यक्तींना द्या धनत्रयोदशीच्या मराठीतून शुभेच्छा.
धार्मिक मान्यतेनुसार सोने हे भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांचे प्रतीक आहे. या दिवशी सोने खरेदी केल्यास सर्वांना आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते. हे आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्यास तुमची संपत्ती वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.
चांदीबद्दल असे म्हटले जाते की, ते चंद्राचे प्रतीक आहे. चंद्रापासून आपल्याला थंडावा मिळतो. मनामध्ये शीतलता आणि शांतता असेल तर जीवन आनंदी होते. याशिवाय आजार दूर होण्यासही मदत होते. त्यामुळेच आयुर्वेदात सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्ये औषधे तयार केली जात असे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची खरेदी केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी नांदते, अशीही एक धार्मिक मान्यता आहे.
आपल्या पुराणानुसार झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. याच कारणामुळे झाडूमध्ये पाय ठेवण्यास मनाई आहे. घरातील झाडूला चुकूनही एखाद्याच्या पायाला स्पर्श झाला तरी वडीलजन नमस्कार करायला सांगतात. ज्योतिषशास्त्रानुसार, झाडू दुःख दूर करते आणि आनंद आकर्षित करते. रोज घर झाडून घेतल्याने कर्ज कमी होते आणि गरिबी दूर होते असे अनेकांनी ऐकले असेल.
भांडी खरेदी करण्याबाबत असे म्हटले जाते की याने भौतिक फायदे मिळतात. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते हे तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल. आयुर्वेदात पितळेच्या भांड्यांना खूप महत्त्व आहे. यामुळेच भांडी आणि विशेषतः पितळेची भांडी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.