रेमडेसिवीरचे घातक परिणाम समोर; या जिल्ह्यात तत्काळ वापर थांबवण्याचे आदेश

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बिकट असताना रुग्णालयांकडून रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. 

Updated: Apr 30, 2021, 08:58 AM IST
रेमडेसिवीरचे घातक परिणाम समोर; या जिल्ह्यात तत्काळ वापर थांबवण्याचे आदेश title=

रायगड : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बिकट असताना रुग्णालयांकडून रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. परंतु जिल्ह्यातील 90 हून अधिक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचे दुष्परिणाम दिसून आले आहे. प्रशासनानेही या माहितीला दुजोरा दिल्याने रायगडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा विस्फोट झालेला असताना रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालये सरसकट रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करीत आहेत. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होताना दिसून येत होता. आता रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानेच रुग्णांवर त्याचे साईड इफेक्ट्स झाल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्हा  अन्न आणि औषध प्रशासनाला हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून 500 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. त्यातील 120 जणांना इंजेक्शन दिले गेले.  परंतु 90 रुग्णांवर त्याचे साईड इफेक्ट्स झाल्याचे दिसून आले आहे.

रुग्णांना थंडी, ताप आल्याचे सांगितले जात आहे. कंपनीकडूनही रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.