सिंधुदुर्ग: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कणकवली मतदारसंघात शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी उमेदवार देण्यात आला आहे. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून बाहेर पडलेल्या सतीश सावंत यांना शिवसेनेने काहीवेळापूर्वीच एबी फॉर्म दिला. यानंतर सतीश सावंत यांनी कणकवलीतून अखेरच्या क्षणी अर्ज दाखल केल्याचे समजते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेकडून सातत्याने विरोध सुरु होता. त्यामुळे भाजपने युतीची घोषणा होण्यापूर्वी राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देणे टाळले होते. मात्र, बुधवारी सिंधुदुर्गात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत अचानकपणे नितेश राणे यांचा छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला होता. त्यावेळी भाजपकडून नितेश यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
अखेर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता कणकवलीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव असला तरी राज्यातील इतर कोणत्याही मतदारसंघांमध्ये हे दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नाही. त्यामुळे कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.