भाजपचा शिवसेनेलाच धक्का; सूर्यकांत दळवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भाजपच्या मेगाभरतीमध्ये आता शिवसेनाचा माजी आमदार गळाला लागला आहे.

Updated: Sep 18, 2019, 11:38 AM IST
भाजपचा शिवसेनेलाच धक्का; सूर्यकांत दळवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी: भाजपच्या मेगाभरती अभियानाचा आता शिवसेनेलाच धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त रत्नागिरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूर्यकांत दळवी यांनी मंगळवारी रात्री उशीरा भेट घेतली. 

त्यामुळे लवकरच सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सूर्यकांत दळवी यांनी सांगितले की, माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. शिवसेना पक्षाने माझी दखल घेतली नाही तर मला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे दळवी यांनी सांगितले.

सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर बुवाबाजीचा आरोप केला होता. रामदास कदम हे जादूटोणा करणाऱ्या बुवांना सोबत घेऊन फिरतात. कदम यांना विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला होता. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळीही सूर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी हे एकाच पक्षात असले, तरीही त्यांच्यातील विस्तव काही जात नाही. त्यामुळे दोघांमध्ये कायम धुसफुस सुरु असते. 

त्यामुळे सूर्यकांत दळवी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांना दापोली मतदारसंघातून उमेदवारी द्यायलाही विरोध दर्शवला आहे. रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये. ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी. माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी त्याच योगदान आहे असा उमेदवार कोणीही चालेल, असेही सूर्यकांत दळवी यांनी म्हटले होते.