रत्नागिरी : सामनातील रत्नागिरी आवृत्तीमध्ये नाणार प्रकल्पाचे समर्थन करणारी जाहीरात आली होती. त्यामुळे शिवसेनेने नाणार संदर्भातील भुमिका बदलली का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे निर्णय आणि धोरण मी ठरवतो ते सामनातून मांडले जातात. कोणता जाहीरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सामनामध्ये अनेक जाहीराती येतात. त्याप्रत्येकात माझा सहभाग नसतो किंवा ती शिवसेनेची भुमिका नसते. त्यामुळे नाणारच्या जाहीरातीबाबतही प्रश्न उपस्थित व्हायचा प्रश्न नाही. जाहीरात आली आणि शिवसेना बदलली असं होत नाही. हा विषय केव्हाच बंद झालाय यावर बोलण्याची गरज नसल्याचे ठाकरे म्हणाले. नाणार संदर्भात कोणी चर्चेसाठीही आले नसल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य शासनातर्फे सिंधुरत्न समृद्द विकास योजना आणण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
यासाठी सर्वपक्षीय आमदारांना बैठकीत स्थान देणार असल्याचे ते म्हणाले.
यामार्फत जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच LED मासेमारी रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्याने प्रकल्पाच्या विरोधात असणारे नाणारवासीय संतप्त झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी या लोकांना रत्नागिरीतील 'सामना'च्या कार्यालयावर धडक मोर्चाही काढला होता.
नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. 'रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच', असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे. नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचे स्थलांतर थांबेल, असा दावा जाहिरातीमधून करण्यात आला होता.