अलिबाग : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांचे हद्दयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या नविद अंतुले यांनी मागील वर्षी अचानक राजकारणात प्रवेश करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांच्या राजकारण प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांनी अचानक शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र त्यांना काही प्रभाव पाडता न आल्यामुळे त्यांची अल्पायुषी राजकीय इनिंग अयशस्वी ठरली.
नविद अंतुले यांना मंगळवारी रात्री उशिरा हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.