झी २४ तास ग्राऊंड रिपोर्ट : पाहा केरळची सद्यस्थिती

 नेव्हीच्या हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्न पोहचवण्याचे कार्यही युद्धपातळीवर करत आहे. 

Updated: Aug 19, 2018, 07:00 PM IST

दिनेश दुखंडे, झी मीडिया, केरळ : पाण्याखाली बुडालेल्या केरळमध्ये आता मदतीचा ओघ सुरू झालाय. युवक युवतींनी मदत कार्यात स्वतःला झोकून दिलंय. राजधानी तिरूवनंतपुरम सध्या मदत कार्याची छावणी झालीय. पाण्याखाली असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत याच मदत छावण्यांमधून जीवनावश्यत वस्तू पोचवल्या जात आहेत. केरळमधला हाहाकार थांबायला तयार नाही. गेल्या २४ तासांत १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. एकूण बळींची संख्या तब्बल ३२५ इतकी आहे. एनडीआरएफ, आर्मी, नेव्हीचे जवान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच नेव्हीच्या हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्न पोहचवण्याचे कार्यही युद्धपातळीवर करत आहे.

पूरग्रस्त सुरक्षितस्थळी

 एनडीआरएफच्या इतिहासातील हे आतापर्यंत सर्वात मोठे मदतकार्य आहे. एनडीआरएफने आतापर्यंत १० हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बचावासाठी एनडीआरएफच्या ५७ टीममधून १३०० लोक कार्यरत असून ४३५ बोट बचाव पथकात आहेत.  

शर्थीचे प्रयत्न 

बीएसएफ आणि आर ए एफ यांच्या पाच तुकडी देखील कार्यरत आहेत. एकूण ३८ हेलिकॉप्टर, २० एअरक्राफ्ट, २० विविध प्रकारची मालवाहतुकीची विमाने रसद आणत आहेत. इंजिनिअरींग टास्क फोर्सच्या दहा पथकाद्वारे ७९० लोक कार्यरत आहेत. नौदलाची ८२ आणि तटरक्षक दलाची ४२ पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्राचा पुढाकार

कुठल्याही संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.  केरळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने २० कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच ११ टन अन्नाची पाकिटंही केरळला पाठवण्यात येणार आहेत. त्यातले सहा टन अन्न तटरक्षक दलामार्फत तातडीने रवाना करण्यात येत आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबईतून मदत

नवी मुंबईतील केरळ भवनात विविध सामाजिक संघटनांच्या नागरिकांनी एकत्रित येत  केरळच्या नागरिकांसाठी पाणी, औषध, कपडे धान्य अशा मूलभूत पदार्थांची मदत केली. तब्बल 50 टन सामान ट्रक तसेचच शिपिंगच्या माध्यमातून पाठविण्यात येत असून नागरिकांना देखील मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. यासोबतच खारघर मधील मायवेट्स संस्थेच्या माध्यमातून देखील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, लहान बालकांसाठी पॅड तसेच बिस्किट्स आणि औषध कुरियरच्या माध्यमातून मदत म्हणून पाठविण्यात येत आहेत.