विमानातील सीटवरून साध्वी प्रज्ञांचा गोंधळ; प्रवाशी संतापले

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. 

Updated: Dec 23, 2019, 03:45 PM IST
विमानातील सीटवरून साध्वी प्रज्ञांचा गोंधळ; प्रवाशी संतापले title=

नवी दिल्ली: वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. साध्वी प्रज्ञा दिल्लीहून भोपाळला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी साध्वी प्रज्ञा दुसऱ्या प्रवाशाच्या सीटवर बसल्या होत्या. त्यामुळे वाद निर्माण झाला. या सगळ्या गोंधळामुळे हे विमान सुटायला पाऊणतास उशीर झाला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

या व्हीडिओत साध्वी प्रज्ञा प्रवाशांशी वाद घालताना दिसत आहेत. साध्वी प्रज्ञा या कोणतीही आगाऊ सूचना न देता व्हीलचेअर घेऊन विमानात आल्या. विमानातील कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. मात्र, तरीही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना विमानात बसण्याची मुभा देण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. परंतु साध्वी प्रज्ञा यांनी कर्मचारी आणि सहप्रवाशांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

काहीतरी कारण आहे म्हणूनच प्रथम दर्जा आणि माझ्यासाठी सुविधा नसतानाही मी या विमानातून प्रवास करत आहे, असे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले. मात्र, संबंधित प्रवाशाने माघार घेण्यास नकार दिला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आम्हाला त्रास देणे हे तुमचे काम नाही. तुम्ही पुढच्या विमानाने यायला पाहिजे होते. तुमच्या एकट्यामुळे ५० प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र, तुम्हाला जराही शरम वाटत नाही, असे प्रवाशाने त्यांना सुनावले.

यावर साध्वी प्रज्ञा यांनी तुम्ही तोंड सांभाळून बोला, असे म्हटले. तेव्हा प्रवाशानेही माझी भाषा योग्यच आहे, असे प्रत्युत्तर साध्वी प्रज्ञा यांनी दिले. अखेर या सगळ्या वादानंतर साध्वी प्रज्ञा यांनी आपली जागा बदलली. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे विमानाला तब्बल पाऊणतास उशीर झाला. 

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर साध्वी प्रज्ञा यांनीही इंडिगो एअरलाईन्सविषयी नाराजी व्यक्त केली होती. इंडिगोचे कर्मचारी प्रवाशांना चांगली वागणूक देत नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी मला आरक्षित आसन दिले नाही. मी त्यांना विमानाची नियमावली दाखवायला सांगितली. मी या सगळ्यांविरोधात संचालकांकडे तक्रार केल्याचेही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले.