...म्हणून या लेखिकेने नाकारला 'पद्मश्री'

जाणून घ्या का नाकारला पुरस्कार

Updated: Jan 26, 2019, 12:45 PM IST
...म्हणून या लेखिकेने नाकारला 'पद्मश्री'  title=
छाया सौजन्य - ट्विटर

नवी दिल्ली : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण आणि प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. 'पुरस्कार देण्याची वेळ योग्य नसल्याने मी हा पुरस्कार घेऊ शकत नाही' अशी माहिती गीता मेहता यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून गीता मेहता यांच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गीता मेहता यांनी म्हटले की, 'भारत सरकारने माझी पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली याचा मला गर्व आहे. परंतु मी हा पुरस्कार घेऊ शकत नाही. याचा मला खेद आहे. भारतात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि हा पुरस्कार देण्यासाठी जी वेळ निवडण्यात आली आहे त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. जो माझी आणि सरकारची प्रतिमा मलीन करू शकतो. याचं मला नेहमी दुख: राहील' असे त्यांनी स्पष्ट केले.

गीता मेहता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी बहीण आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांची मुलगी आहे. गीता यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रांत दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची पद्मश्री पुरस्कारसाठी निवड करण्यात आली होती. पद्मश्री देशातील चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे. गीता यांनी त्यांच्या गेल्या ४० वर्षांतील साहित्यिक जीवनात अनेक उल्लेखनीय पुस्तके लिहीली आहेत. सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहत असल्याची माहिती मिळत आहे.