आर्मी, नेव्हीतल्या महिला अधिकाऱ्यांसाठी संरक्षण दलाकडून खुशखबर

आत्तापर्यंत आर्मीच्या १० खात्यांमध्ये महिला ऑफिसर्ससाठी 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन'द्वारे प्रवेश होता

Updated: Mar 6, 2019, 10:16 AM IST
आर्मी, नेव्हीतल्या महिला अधिकाऱ्यांसाठी संरक्षण दलाकडून खुशखबर  title=

नवी दिल्ली : वायुदलापाठोपाठ आता आर्मी आणि नेव्हीतही महिलांना कायम स्वरूपी कमिशन मिळणार आहे. म्हणजेच यापुढे महिला निवृत्ती वयोमर्यादेपर्यंत सेनेत काम करू शकतील. वायुदलात याआधी पर्मनन्ट कमिशन होतं. फायटर पायलट होण्याची संधीही नुकतीच महिलांना खुली करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता नेव्ही आणि आर्मीनेही महिलांना स्थायी रुपात कमिशन देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या सेनेतील समावेशाबद्दल घेतलेला हा एक मोठा निर्णय आहे. सेनेतील महिलांच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्याच्या मार्गानं पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे, असं म्हणायला हरकत नाही.  

नौदलात सध्या प्रत्यक्ष युद्ध नौकेवरील कर्तव्याव्यतिरिक्त सर्व विभागात महिला अधिकारी कार्यरत आहेत. या महिला अधिकारी 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन' म्हणजे १० वर्षांच्या सेवेत अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते. १० वर्षांनंतर त्यांची कार्यसेवा आणखी चार वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते. परंतु, १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अधिकारी कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

तसंच आर्मीच्या १० खात्यांमध्ये महिला ऑफिसर्ससाठी 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन'द्वारे प्रवेश होता. त्या सर्व ठिकाणी आता 'पर्मनन्ट कमिशन' लागू होणार आहे.  

याआधी एडव्होकेट जनरल आणि आर्मी एज्युकेशन कोअरमध्ये महिलांना कायम स्वरूपी कमिशन होतं. मात्र आता सिग्नल्स, अभियांत्रिकी, एव्हीएशन, एअर डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरींग, आर्मी सर्व्हिस कोअर, दारूगोळा विभाग, आर्मी गुप्तवार्ता या विभागातही कायम स्वरूपी कमिशन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.