'देश महिलांसाठी असुरक्षित आणि पंतप्रधान योग व्हिडिओ बनवतायत'

'एकीकडे आपले पंतप्रधान योग व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत तर...'

Updated: Jun 26, 2018, 04:09 PM IST
'देश महिलांसाठी असुरक्षित आणि पंतप्रधान योग व्हिडिओ बनवतायत' title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक आंतरराष्ट्रीय सर्व्हे शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. या सर्व्हेमध्ये 'महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश' म्हणून भारताचा उल्लेख करण्यात आलाय. हाच रिपोर्ट शेअर करत राहुल गांधी यांनी ट्विटर म्हटलंय, 'ही आपल्या देशासाठी केवढी लज्जास्पद बाब आहे'... ते पुढे म्हणतात 'महिला असुरक्षित आहेत आणि पंतप्रधान योग व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत'... 

एकीकडे आपले पंतप्रधान योग व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत तर दुसरीकडे महिलांविरुद्ध बलात्कार आणि हिंसेच्या प्रकरणात भारताची स्थिती अफगानिस्तान, सीरिया आणि सौदी अरबहून अधिक खराब झालीय. 

राहुल गांधी यांनी सीएनएनची एक बातमी शेअर केलीय. यात 'थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन' सर्व्हेचा उल्लेख करत लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमुळे भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचं म्हटलंय. थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशननं हा रिपोर्ट मंगळवारी जाहीर केलाय. यामध्ये महिलांशी निगडीत ५५० विशेषज्ञांचा सल्ला घेण्यात आलाय. 

सर्व्हेत अॅसिड अटॅक, महिलांचा लैंगिक छळ, बालविवाह, शारीरिक अत्याचार प्रकरणांमध्ये भारत असुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. जवळपास सात वर्षांपूर्वी या सर्व्हेत भारत चौथ्या क्रमांकावर होता. भारतानंतर क्रमांक लागतो तो अफगानिस्तान, सीरिया, सोमालिया, सौदी अरब, पाकिस्तान, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, यमन, नायजेरिया आणि दहाव्या क्रमांकावर अमेरिका आहे.