Video What Did Amit Shah Said About Babasaheb Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मंगळवारी लोकसभेमध्ये भाषणादरम्यान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शाहांनी भाषणाच्या सुरुवातीला केलेल्या विधानाला विरोधकांनी विरोध केला आहे. आज हाच विरोध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी हातात आंबेडकरांचा फोटो घेऊन लोकसभेच्या वास्तूबाहेर आंदोलन केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शाहांच्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अमित शाहा नेमकं काय म्हणाले होते आणि यावर सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच नजर टाकूयात...
मंगळवारी लोकसभेमध्ये 'एक देश, एक निवडणूक' विधेयक मांडण्यात आलं. यावर विरोधकांनी सदर विधेयक हे संविधानविरोधात आहे असा आक्षेप घेतला. बाबासाहेबांच्या संविधानाच्याविरोधात हे विधेयक असून संघराज्य पद्धतीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. यावरुन अनेक खासदारांनी आपली भूमिका सदनासमोर मांडली. त्यानंतर या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांनावर निशाणा साधला. मात्र भाषणाची सुरवात करताना त्यांनी आंबेडकरांचं नाव घेतलं. मात्र त्यांची नाव घेण्याची शैली सध्या टीकेचा विषय ठरत आहे.
"आता एक फॅशन झाली आहे. आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग लाभला असता," असं अमित शाहांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधताना लोकसभेतील भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं. याच मुद्द्यावरुन आता विरोधकांनी अमित शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. ज्या पद्धतीने अमित शाहांनी अनेकदा आंबेडकरांचं नाव घेतलं ते अपमानास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अमित शाहांच्या या विधानाचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत अमित शाहांवर निशाणा साधला आहे, "बाबासाहेबांचा असा अपमान केवळ आणि केवळ तीच व्यक्ती करु शकते जिच्या मनात बाबासाहेबांच्या संविधनाबद्दल द्वेष आहे. ज्यांच्या पुर्वजांनी शोषित आणि वंचितांसाठी दूत असलेल्या बाबासाहेबांचे पुतळे जाळले तेच असं बोलू शकतात. या संघाच्या लोकांना बाबाबासाहेबांच्या नावाचा एवढा त्रास का होतो? त्यांना या नावाबद्दल इतकी घ्रृणा का आहे?" असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला आहे.
“अभी यह फैशन चल गया है अंबेडकर अंबेडकर अंबेडकर नाम लेने का
इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता” : अमित शाह
बाबा साहेब का यह अपमान सिर्फ़ और सिर्फ़ वो आदमी कर सकता है जिसको उनके संविधान से चिढ़ है
और जिसके पुरखों ने शोषितों वंचितों के मसीहा बाबासाहेब के पुतले जलाये… pic.twitter.com/1CLVEJDtRi
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 17, 2024
एकीकडे विरोधकांकडून अशी टीका होत असतानाच सत्ताधारी भाजपा समर्थकांकडून अमित शाहांनी काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान वेळोवेळी केला हे पटवून देण्यासंदर्भात काही ऐतिहासिक संदर्भ देण्याआधी हे विधान केल्याचं म्हटलं आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी भाजपा समर्थकांकडून अमित शाहांच्या याच भाषणाचा पुढील भागाचा व्हिडीओ व्हायरल केला जातोय. ज्यामध्ये अमित शाहांनी कशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मुद्द्यांवर कोणतीही दखल न घेण्यात आल्याने पहिल्या सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला याबद्दलची माहिती संदर्भातसहीत वाचून दाखवल्याचं दिसत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या प्रदीप भंडारी यांनी श्रीनेत यांच्या पोस्टला रिप्लाय करताना हा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे. "तुमच्या पक्षाचं ढोंग अमित शाहांनी उघड फाडलं. व्हिडीओचा तुकडा सत्य बदलू शकत नाही. सत्य हेच आहे की काँग्रेस बाबासाहेबांचा द्वेष करते," असं भंडारी यांनी म्हटलं आहे.
Supriya ji,
You are a Fake News Factory.
HM @AmitShah ji was exposing your party - Congress' Hypocrisy!
Clipped video won't change the reality of Congress which hates Baba Saheb Ambedkar !
Here's the Full Speech- https://t.co/hyDNjb478L pic.twitter.com/y9off3YtNs
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)(@pradip103) December 17, 2024
अमित शाहांच्या या विधानावरुन विधानसभेच्या तिसऱ्या दिवसाच्या अधिवेशनाआधीही अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड यासारख्या विरोधीपक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे.