मुंबई : पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्यानं अमूल पाठोपाठ आता गोकुळ दूध संघही दरवाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विक्री दरात 2 रुपयांची वाढ होऊ शकते. आज गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची महत्वाची बैठक होणारे आहे. या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब होणारे आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस महागले आहेत. त्यात आता दुधाचे दरही वाढणार असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणारे आहे. आवश्यक असलेल्या वस्तूंवर सतत होत असलेल्या दर वाढीमुळे नागरिकांच्या महिन्याचं गणित चूकत आहे.
दरम्यान, 1 जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे. गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांत नवीन दर लागू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांच्या किंमती वाढवल्यानंतर अमूलने आता दुधाच्या किंमती वाढविल्या आहेत.
इतर उत्पादनांच्या किंमतीही वाढू शकतात. दुधाचे दर वाढल्यानंतर आता अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. पनीर, लोणी, तूप, ताक, लस्सी, आईस्क्रीमच्या किंमतीही वाढू शकतात. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत गोकुळ दुधाचे दर किती रूपयांनी वाढतात आणि नवे दर कधीपासून लागू होतात. या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.